वाढत्या वजनामागे 'ही' कारणे देखील असू शकतात, त्यासाठी लगेच करून घ्या 'या' टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:34 PM2021-07-21T13:34:18+5:302021-07-21T13:49:54+5:30
वजन वाढणे हे फक्त आहार आणि व्यायाम यावरच अवलंबून नसते. त्या मागे इतर कारणही असू शकतात. त्यासाठी तुम्ही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
वजन वाढल्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. यामुळे आवडीचे कपडे परिधान करण्यामध्येही अडचणी निर्माण होतात. शिवाय आत्मविश्वासावरही परिणाम होऊ लागतो. वजन घटवण्यासाठी काही जण वर्कआउटपासून ते डाएटिंग इत्यादी कित्येक प्रकारचे उपाय करून पाहतात. पण इतके प्रयत्न करूनही काही जणांचे वजन कमी (Weight Loss) होत नाही. त्यामुळे वजन वाढणे हे फक्त आहार आणि व्यायाम यावरच अवलंबून नसते. त्या मागे इतर कारणही असू शकतात. त्यासाठी तुम्ही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
पीसीओएस
पीसीओएस (PCOS) होण्याचे मुख्य आणि एकमेव कारण आहे हार्मोन (hormone) म्हणजे संप्रेरक शरीरात अनियमित तयार होणे. आजकाल पीसीओएस (PCOS) फार प्रमाणात आढळतो. याचं मुख्य कारण बदलती जीवनशैली! हे महिलांमध्ये वजन वाढण्याचं प्रमुख कारण असतं. अनियमित संप्रेरक अंडकोषात अंडी तयार होऊ देत नाहीत. जर झालीच तर अंडकोषातून बाहेर पडायला मज्जाव करतात. तयार झालेले अंड अंडकोषातच राहातं. तसंच पाण्याचा बुडबुडा अंडकोषात तयार होतो. प्रत्येक महिन्यात ही प्रक्रिया होते आणि अंडकोषात अनेक पाण्याच्या गाठी (cyst) तयार होतात. पीसीओएस (PCOS)ची तपासणी, चाचणी आणि उपाय योग्य वेळेत होणं फार आवश्यक आहे. जर उशीर झाला तर अंडाशय कायमचं निकामी होऊ शकतं.
थायरॉइड टेस्ट
थायरॉइड हॉर्मोन्सचे रक्तातील स्राव कमी झाल्यावर हा विकार उद्भवतो. याचं वजन वाढणे हे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय थकवा येणे, केस गळणे आदीही लक्षणे या विकारात आढळून येतात. हा विकार शोधण्याचा सोपा उपाय म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटींग हॉर्मोन अर्थात टीएसएच तपासणी. हॉर्मोन थेरपी देऊन या विकारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
ब्लड शुगर टेस्ट
ब्लड शुगर टेस्ट ही अशी प्रक्रिया आहे जी आपल्या रक्तातील साखर किंवा ग्लुकोजचे प्रमाण मोजते. मधुमेहाचे निदान करण्यासाठी ही चाचणी केली जाते. मधुमेह हे वजन वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मधूमेह आहे का नाही हे ओळखण्यासाठी ही टेस्ट काहीही न खाता-पिता 12 तासांनंतर केली जाते. रक्तातील साखरेचं प्रमाण 99 पेक्षा कमी असेल तर सामान्य मानलं जातं.
लिपिड प्रोफाईल टेस्ट
कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि तुमचे वजन याचा थेट संबध असतो. त्यासाठी लिपिड प्रोफाईल टेस्ट करून घ्या. ही एक रक्त तपासणीसारखीच चाचणी असते. ही चाचणी तुमच्या हृदयाच्या आणि रक्तवाहिन्यांच्या रोगाशी निगडित आहे. ही चाचणी रक्ताची चाचणी, टोटल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, एचडीएल आणि एलडीएलची पातळी मोजण्यासाठी केली जाते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयरोग किंवा मधुमेह असेल, तर त्या व्यक्तीने वर्षातून एकदा ही चाचणी करायला हवी.