सावधान! लहान मुलांमध्ये वाढतोय कॅन्सरचा धोका; जाणून घ्या, लक्षणं आणि उपाय, वेळीच व्हा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:35 AM2022-02-10T11:35:07+5:302022-02-10T11:36:49+5:30
Cancer in Children : तरुणांनाच नव्हे तर आता चिमुकल्यांना देखील कॅन्सरने विळखा घातला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण अधिक चिंताजनक आहे.
नवी दिल्ली - कॅन्सर हा अतिशय गंभीर आजार आहे. या आजाराबाबत वेळीच समजलं नाही तर या आजाराने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कॅन्सर होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, शरीरातील पेशी असामान्य झाल्या की कॅन्सर होतो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये स्तनाचा कॅन्सर, त्वचेचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सरचा समावेश आहे. तरुणांनाच नव्हे तर आता चिमुकल्यांना देखील कॅन्सरने विळखा घातला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये कॅन्सरचे वाढते प्रमाण अधिक चिंताजनक आहे. मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरच्या काही लक्षणांबाबत जाणून घेऊया...
लहान मुलांमध्ये आढळतात 'ही' लक्षणं
- त्वचा पिवळसर होणे.
- तोंडातून किंवा नाकातून रक्त येणे.
- हाडं दुखणं
- चालताना त्रास होणं
- पाठदुखी
- पोटात किंवा मांडीवर गाठ येणे
- सकाळी उलट्या होणे
- सतत ताप येणे
- एकदम वजन कमी होणे
- दिसण्याची क्षमता कमकुवत होते.
काही आजारांमुळे मुलांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. जसं की डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांमध्ये ल्युकेमिया होण्याची शक्यता 10-20 पट जास्त असते. या शिवाय कॅन्सर हा काहीवेळा तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. जर तुम्हाला कॅन्सर असेल, तर तुमच्या मुलाला भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता असते. रेटिनोब्लास्टोमा हा डोळ्यांच्या कॅन्सर दुर्मिळ प्रकार आहे. मुलाला डोळ्यांचा त्रास असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. एका रिपोर्टनुसार, EVB हा लहान मुलांमध्ये एक सामान्य संसर्ग आहे. त्यामुळे मुलांमध्ये कॅन्सर पसरतो.
कॅन्सरपासून असा करा बचाव
- मुलांना कॅन्सरपासून दूर ठेवण्यासाठी, विशेषतः स्वतःला आणि मुलाला धूम्रपान किंवा तंबाखूच्या सेवनापासून दूर ठेवावे लागेल.
- मुलांच्या रोजच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
- बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा.
- मुलांच्या त्वचेकडे तसेच मुलांच्या वजनाकडे विशेष लक्ष द्यावे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.