सावधान! 'हे' प्लास्टिक आहेत सर्वात जास्त धोकादायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 12:09 PM2018-07-04T12:09:35+5:302018-07-04T12:13:45+5:30
महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे चांगले, वाईट पडसाद उमटलेले आपल्याला पहायला मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरातूनही प्लास्टिक बॅग्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चा सुरू आहेत.
मुंबई - महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे चांगले, वाईट पडसाद उमटलेले आपल्याला पहायला मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरातूनही प्लास्टिक बॅग्सच्या वापरावर बंदी घालण्याच्या चर्चा सुरू आहेत. प्लास्टिक सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे, असे म्हटले तरिही वावगे ठरणार नाही.
आपल्या जेवण्याच्या डब्ब्यापासून कॅरी बॅग, जेवणाचे कंटेनर, खिडक्या-दरवाजांचे पडदे, फर्निचर, पाण्याच्या बाटल्या, ग्लासेस यांसारख्या अनेक गोष्टी प्लास्टिकपासूनच बनलेल्या असतात. परंतु हे आपल्यातील अगदी कमी लोकांना माहिती आहे की, या सर्व गोष्टी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. जगभरात 7 प्रकारचे प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. या सर्व प्लास्टिकची ओळख पटावी म्हणून त्यांना वेगवेगळे कोड दिलेले आहेत. तसे पहायला गेले तर सर्वच प्रकारचे प्लास्टिक हे आपल्या शरिरासाठी नुकसान पोहोचवतात. परंतु प्रत्येक प्लास्टिकमधील घटक वेगळे असल्याने त्याच्यापासून होणारे नुकसान हे कमी जास्त प्रमाणात असते. आपण जाणून घेऊयात या प्लास्टिकच्या प्रकारांबाबत...
कोड 1 प्लास्टिक -
या प्रकाराच्या प्लास्टिकमध्ये पॉलीएथिलीन टेराफ्थलेट असते. पॉलिस्टरचे कपडे, तसेच ज्यूस, माउथवॉश, जॅम आणि पाणी यांसारख्या पदार्थ्यांच्या बॉटल्स या प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवण्यात येतात.
पॉलीएथिलीन टेराफ्थलेटमध्ये लीच अॅन्टीमोनी ट्राइऑक्साइड आणि phthalates असतात. हे दोन्ही घटक शरिरासाठी घातक असतात. अॅन्टीमोनी ट्राइऑक्साइडमुळे कॅन्सरसारखे आजार जडण्याचा धोका संभवतो. याव्यतिरिक्त यामुळे त्वचेशी निगडीत प्रॉब्लेम्स, मासिक पाळी आणि गरोदरपणातही अडचणी निर्माण होऊ शकतात.
कोड 2 प्लास्टिक -
या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पॉलिथीन असते. दूध, ज्यूस, शॅम्पू, डिटरजेंट आणि काही औषधांच्या बाटल्या या प्लास्टिकपासून बनवण्यात येतात. या प्लास्टिकचा कमी वापर केला तर फार नुकसान पोहचत नाही.
कोड 3 प्लास्टिक -
या प्लास्टिकमध्ये पॉलिविनाइल क्लोराइडचा समावेश असतो. पॉलिविनाइल क्लोराइडपासून लहान मुलांची खेळणी, माउथवॉशच्या बाटल्या, खिडक्यांचे फ्रेम, शॅम्पूच्या बाटल्या यांसरख्या वस्तू बनवण्यात येतात. जर तुम्ही या प्लास्टिकचा अधिक वापर केला तर आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होतो.
यामध्ये बिस्फेनॉल (BPA), शिसे, पारा, डायऑक्सीन, कॅडमियमसारख्या घटकांचा समोवेश होतो. याघटकांच्या संपर्कात आल्यामुळे अस्थमासारख्या आजारांना सामोरो जावे लागते. तसेच यामुळे लहान मुलांना अॅलर्जी होते. याचबरोबर या प्लास्टिकचा वातावरणावरही वाईट परिणाम होतो. या प्लास्टिकमधील घटकांमुळे कॅन्सर होण्याची शक्याता सर्वाधिक असते. ज्यामध्ये मुख्यत्वेकरून ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
कोड 4 प्लास्टिक -
या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये कमी घनता असलेले पॉलिथिन (LDPE) असते. पॉली बॅग, फ्रोजन फूड, गार्बेज, तारेच्या केबल, जेवणाचे डब्बे इत्यादी वस्तू तयार करण्यात येतात. हे प्लास्टिक इतर प्लास्टिकच्या तुलनेत कमी नुकसान पोहोचवते.
कोड 5 प्लास्टिक -
यामध्ये पॉलिप्रोपलीन (PP) सारखे घटक असतात. या प्लास्टिकचा उपयोग लहान मुलांचे डायपर, सॅनिटरी नॅपकिन, स्ट्रॉ, चीज, दही ठेवण्यासाठीचे कंटेनर बनवण्यासाठी करण्यात येतो. तसे पाहाता या प्लास्टिकमुळे शरिराला फार नुकसान होत नाही, परंतु यामुळे अस्थमा होण्याचा धोका असतो.
कोड 6 प्लास्टिक -
या प्लास्टिकमध्ये पॉलिस्टीरीन असते. या प्लास्टिकचा सर्वात जास्त परिणाम हा नर्वस सिस्टम आणि मेंदूवर होतो. प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की, कोड 6 च्या प्लास्टिकमुळे फुफ्फुस, लिव्हर आणि रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
कोड 7 प्लास्टिक -
या प्रकारच्या प्लास्टिकमध्ये पॉलिकार्बोनेट असते. पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे मोठे कंटेनर, केचप आणि ज्यूसचे कंटेनर, चश्म्याच्या काचा, सीडी, डिव्हीडी इत्यादी वस्तूंमध्ये कोड 7 प्रकारचे प्लास्टिक असते.
या प्रकारच्या प्लास्टिकच्या वापरामुळे शरिरात एस्ट्रोजेन हार्मोनमध्ये अडथळा निर्माण होतो. याव्यतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मधुमेह, लठ्ठपणा, ब्रेस्ट कॅन्सर तसेच ह्रदयाशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते.