उसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे, कुणी राहावं सावध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:49 PM2018-04-09T12:49:33+5:302018-04-09T13:14:18+5:30
उसाचा रस आरोग्यास चांगला मानला जातो. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच दातांच्या समस्याही कमी होतात.
उन्हाळा आला की, अनेकजण थंड होण्यासाठी आणि एनर्जी मिळवण्यासाठी उसाच्या रसाला प्राधान्य देतात. उसाच्या रसाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. उसाचा रस केवळ उन्हापासून आपला बचाव करत नाही, तर अनेक आजारांनाही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा मिळते. तसंच ऊस शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते.
उसाच्या रसात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी पोषक तत्वे असतात. म्हणून उसाचा रस आरोग्यास चांगला मानला जातो. यामुळे हाडे मजबूत होतात तसेच दातांच्या समस्याही कमी होतात. पण तरीही उसाच्या रसाचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी हा रस नुकसानकारक ठरू शकतो.
उसाचा रस पिण्याचे तोटे
1) उसाच्या रसात मोठय़ा प्रमाणात कॅलरी तसेच कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे जे वजन कमी करताहेत त्यांनी उसाचा रस पिऊ नये.
2) जर तुम्हाला डायबिटीजचा त्रास असेल तर उसाचा रस दूरच ठेवावा. यात साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे उसाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
3) तुमची ब्लड शुगर लेवल अचानकपणे वाढत असेल तर ऊसाच्या रसाचे सेवन करू नये. यामुळे ब्लड इन्फेक्शन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
4) कफाचा त्रास असल्यास उसाचा रस पिणे टाळा. यामुळे कफाचा त्रास वाढतो.
5) दिवसातून केवळ दोन ग्लासच ऊसाचा रस प्यावा, त्यापेक्षा अधिक रस एका दिवसात घेतला तर त्यामुळे नुकसान होऊ शकते. जॉइन्डिस असल्यास तुम्ही अधिक प्रमाणात रस पिऊ शकता.
6) फ्रिजमध्ये ठेवलेला उसाचा रस पिणं टाळावं, कारण फ्रिज केलेला उसाचा रस आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
7) उसाच्या रसामध्ये इतर कोणताही रस मिक्स करू नये. तसंच उसाच्या रसात पाणी टाकू नये. त्यानं ऊसाच्या रसाचे गुणधर्म कमी होऊ शकते. बर्फही कमीच वापरावा.