'ही' असू शकतात स्किन कॅन्सरची लक्षणं; दुर्लक्षं करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 04:24 PM2019-05-10T16:24:47+5:302019-05-10T16:29:06+5:30
त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो.
(Image Credit : Consulting Room)
त्वचेच्या कर्करोगाची समस्या लोकांमध्ये वेगाने वाढत आहे. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. त्वचेचा कर्करोग हा सतत त्वचा सुर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे होण्याची शक्यता असते.
मुख्यत: केसांची त्वचा, चेहरा, ओठ, कान, मान, छाती, हात व विशेषत: महिलांचे पाय या अवयवांच्या त्वचेवर हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. मेलनोमा हा त्वचेचा कर्करोग गडद रंगाची त्वचा असणाऱ्या लोकांमध्ये अधिक आढळतो. सर्व प्रथम तो एका मोल्सच्या रुपात आढळतो मात्र नंतर त्यांचे गंभीर कर्करोगामध्ये रुपांतर होते. बऱ्याचदा पुरुषांचे डोके व मान या अवयवांवर याचा अधिक प्रभाव आढळतो. तर स्त्रियांमध्ये हा विकार त्यांच्या पायाच्या खालच्या भागावर आढळतो. कधी कधी या रोगाचा प्रभाव हातपायांच्या नखांवर स्तनांवर, काखेत आढळतो.
mayoclinic.org ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकदा त्वचेवर दिसणारी लक्षणं ही स्किन कॅन्सरची आहेत, हे समजणं शक्य होत नाही. आज आम्ही काही लक्षणं सांगणार आहोत, त्यामुळे ही लक्षणं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. योग्य वेळी जर यावर उपचार केले नाहीत तर स्किन कॅन्सर जीवघेणाही ठरू शकतो.
(Image Credit : Teen Vogue)
स्किन कॅन्सरची लक्षणं :
जळजळ होणं
मान, कपाळ, गाल आणि डोळ्यांच्या आसपास अचानक जळजळ होऊ लागते. तेव्हा याकडे दुर्लक्षं करणं अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कारण कदाचित हे स्किन कॅन्सरचं लक्षणं ठरू शकतं.
डाग
जर तुमच्या त्वचेवर अचानक डाग आले असतील आणि ते बरेच दिवस जात नसतील तर हे देखील स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. चार किंवा पाच आठवड्यांपेक्षा जास्त दिवस हे डाग दिसत असतील तर हे अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
बर्थ मार्कमध्ये बदल होणं
स्किनमध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात. जसं तुमच्या शरीरावर अनेक बर्थमार्क असतील आणि त्यांचा आकार वाढू लागला किंवा खाज येत असेल तर स्किन कॅन्सर असण्याचा संकेत असू शकतो.
त्वचेवरील तीळाचा आकार आणि रंग बदलणं
तुमच्या त्वचेवर तीळ आहे आणि त्याचा अचानक शेप आणि रंग बदलला किंवा त्याच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलला तर डॉक्टरां सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
पिंपल्सचा आकार वाढणं
जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सचा आकार वाढत असेल आणि त्याचा रंगही बदलत असेल तर स्किन कॅन्सर होण्याती शक्यता असते.
एक्जिमा होणं
एक्जिमा म्हणजेच खाज येणं. हेदेखील स्किन कॅन्सरचं लक्षणं आहे. जर ही समस्या कोपर, हात किंवा गुडघ्यांवर दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्षं करू नका. डॉक्टरांता त्वरित सल्ला घ्या.
खाज येणं
जर तुम्हाला उन्हामध्ये गेल्याने सतत खाज येत असेल तर हेदेखील स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
असा करा बचाव :
- घराबाहेर पडताना शरीरावर थेट सूर्यकिरणं पडणार नाहीत याची काळजी घ्या.
- त्वचेवर अचानक डाग दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- भरपूर पाणी प्या, ज्यामुळे स्किन कॅन्सर होण्याचा धोका वाढत नाही.
- त्वचेवर लोशन, मॉयश्चरायझर इत्यादींचा वापर करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.