उन्हाळ्यात हे पाच पदार्थ ठेवतील तुम्हाला "कुल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:37 PM2019-04-25T17:37:32+5:302019-04-25T17:45:10+5:30
उन्हाळा म्हटलं की बाजारातले आईस्क्रीम, थंडपेय आपल्याला आठवतात. पण त्यापेक्षा शरीराच्या आतून थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करण्याची गरज असते. तेव्हा कोणत्याही जाहिरातीला न भूलता या पाच थंड गुणधर्माच्या पदार्थांचा आवर्जून आहारात समावेश करा आणि उन्हाळ्याचे आजार दूर पळवा.
पुणे : उन्हाळा म्हटलं की बाजारातले आईस्क्रीम, थंडपेय आपल्याला आठवतात. पण त्यापेक्षा शरीराच्या आतून थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करण्याची गरज असते. तेव्हा कोणत्याही जाहिरातीला न भूलता या पाच थंड गुणधर्माच्या पदार्थांचा आवर्जून आहारात समावेश करा आणि उन्हाळ्याचे आजार दूर पळवा.
गुलकंद : चवीला गोड, स्वादिष्ट असणाऱ्या गुलकंदाची चव प्रत्येकाने दिवसातून एकदा तरी घ्यायला हवी. थंड दुधात किंवा थेट पण गुलकंदाचे सेवन आवर्जून करावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पचनाचे विकार कमी होतात.
जिऱ्याचे पाणी :हे ऐकायला जरी नवीन असले तरी रात्रभर एका ग्लासात चमचाभर जिरे भिजत घालून त्या पाण्याचे अनशापोटी सेवन करावे. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. हे पाणी प्यायल्यावर जिरे चावून खावेत. त्यामुळे अधिक आराम पडतो.
सब्जा आणि तुळशीचे बी : सब्जा आणि तुळशीचे बी यापैकी काहीतरी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सेवन करावे. हा सर्वात खात्रीशीर उपाय असून उन्हाळी लागलेल्या व्यक्तीने तर दर तासाला असे पाणी प्यावे.
ताक : ताक हे पृथ्वीवरचे अमृत मानले जाते. विशेषतः जेवताना ताकाचा समावेश अवश्य करा. त्यात हिंग आणि काळे मीठ घालावे. ताक दिवसातून दोन ते तीन वेळा प्यायल्यास असे ताक प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो.
कोथिंबीर : खूप जणांना माहिती नाही पण कोथिंबीर थंड धर्माची असते. कोथिंबीर वाटून केलेला रस हा उष्णतेचे विकार आणि पित्तावर गुणकारी आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कोथिंबिरीचे सेवन वाढवा. अगदी रस नाही केला तर जेवताना कोथिंबीर धुवून, चिरून खाल्ली तरी उन्हाचा त्रास कमी होईल.