हृदयाच्या आरोग्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 10:10 AM2020-02-29T10:10:37+5:302020-02-29T10:13:47+5:30
अतिरिक्त ट्रान्स-फॅट असलेल्या पदार्थांमधील धोक्यांबद्दल ग्राहकांना जागरुक करणे, हा यामागील उद्देश आहे.
हृ्द्यासाठी ट्रान्स-फॅटी एसिड्स (टीएफए) हे सर्वाधिक धोकादायक फॅट्सपैकी एक असून हृदयरोग व स्ट्रोक्समागील जगभरातील हे प्राथमिक कारण मानले जाते. मुख्यतः अंशतः हायड्रोजिनेटेड वनस्पती तेल (औद्योगिक टीएफए) आणि प्राणीजन्य पदार्थ, या दोन स्त्रोतांपासून मिळणाऱ्या या फॅट्समुळे रक्तातील कोलेस्टरॉलच्या प्रमाणावर विपरित परिणाम होऊन हृदयरोगांचा धोका वाढतो, असे आजवरच्या अभ्यासावरून स्पष्ट होते. हृदयाच्या आरोग्यावर ट्रान्स-फॅटचा होणारा हा धोकादायक परिणाम लक्षात घेऊन फूड सेफ्टी एण्ड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) अलिकडेच ‘ईट राईट मूव्हमेंट’ हा उपक्रम हाती घेतला. अतिरिक्त ट्रान्स-फॅट असलेल्या पदार्थांमधील धोक्यांबद्दल ग्राहकांना जागरुक करणे, हा यामागील उद्देश आहे.
२०२२ पर्यंत भारतीय आहार पद्धतींमधून औद्योगिकरित्या तयार करण्यात येणाऱ्या टीएफएचे पूर्ण निर्मूलन करण्यासाठी विविध भागधारकांसोबत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. टीएफएमुक्त जगाचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य परिषदेनेही ठेवले आहे. त्याच्या एक वर्ष आधीच भारतात हा टप्पा गाठण्याचा प्रयत्न आहे.
याविषयी दिल्ली विद्यापिठातील इन्स्टिट्यूट ऑफ होम इकॉनॉमिक्सच्या डिपार्टमेंट ऑफ फूड अॅण्ड न्यूट्रिशन अॅण्ड फूड टेक्नॉलॉजीच्या टीचर-इन-चार्ज, सहाय्यक प्राध्यापिका डॉ. रजनी चोप्रा म्हणाल्या, “मुबलक प्रमाणात चांगले फॅट्स असलेले वनस्पतीजन्य तेल हृदयासाठी आरोग्यदायी असतात. वनस्पतीजन्य तेलातून पेशीय पातळीवर कमाल कार्यचलनासाठी योग्य प्रमाणात पोषणतत्त्वे मिळतात. सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी अनसॅच्युरेटेड फॅट्सचा पर्याय अवलंबल्याने आरोग्याचे उत्तम फायदे मिळतात.” ट्रान्स-फॅटला दूर ठेवण्यासाठी काही आरोग्यदायी पर्याय त्यांनी सुचवले, “बटरऐवजी (सॅच्युरेटेड फॅट) सूर्यफुलाच्या तेलाचा (अनसॅच्युरेटेड फॅट) वापर केल्याने रक्तातील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होते आणि हृदयरोग व स्ट्रोकचा धोका कमी होतो. इतकेच नव्हे तर, भारतातील अनेक वनस्पतीजन्य तेलांमध्ये अ आणि ड जीवनसत्त्वांसारख्या अनेक जीवनसत्त्वांचा समावेश असतो. आपल्या एकूण आरोग्यासाठी ही फारच हितकारक बाब आहे.”
सामान्यपणे, आरोग्यतज्ज्ञांच्या मते आपण प्राणीजन्य फॅटऐवजी (बटर, तूप वगैरे) वनस्पती तेलाचा वापर करायला हवा. शिवाय, आरोग्यदायी हृदयासाठी वारंवार गरम केलेले तेल तसेच हायड्रोजिनेटेड फॅट/वनस्पतीचा वापर करून तयार केलेले पदार्थ टाळावेत. उदा. तेलाचा वापर करून बनवलेल्या कुकीज आणि बिस्किटे, डेअरी फॅट नसलेले आइसक्रीम/फ्रोजन डेझर्ट्स आणि चॉकलेट्स, हायड्रोजिनेटेड वनस्पती तेलाचा वापर न करता बनवलेले, भाजलेले नाश्त्याचे पदार्थ आणि बेकरी पदार्थ खा. तेल आणि चरबी हे भारतीय स्वयंपाक पद्धतीतील महत्त्वाचे घटक आहेत. टेम्परिंग, परतणे, भाजणे, तळणे, बेकिंग, तेलाचा मुलामा लावणे अशा अनेक प्रकारे आपण तेल आणि चरबी वापरतो. आपण खात असलेला पदार्थ किती आरोग्यदायी वा आरोग्याला हानीकारक आहे, हे ठरवण्यात चरबीचा प्रकार आणि त्याच्या स्रोताचा मोठा वाटा असतो.
पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, मठरी अशा अनेक पदार्थांमधून आपल्या आहारात ट्रान्स-फॅटचा समावेश होतो. याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ईट लँसेंट अहवालामध्ये 'प्लॅनेटरी हेल्थ डाएट' नमूद करण्यात आले आहे. यानुसार, तेल आणि चरबीचा एकूण वापर दिवसाला सुमारे १० टीस्पून इतकाच असावा. यात घरातील अन्नातील चरबी आणि स्थानिक पातळीवर मिळणारे पदार्थ आणि पाकिटबंद अन्नपदार्थांमधील फॅटचाही समावेश आहे. या अहवालानुसार, यातील अर्ध्याहून अधिक प्रमाणातील फॅट्स विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य अनसॅच्युरेटेड फॅट्स/तेलातून मिळायला हवेत.
याबाबत एम्समधील बालरोगविभागातील ज्येष्ठ आहारतज्ज्ञ (पीडिआट्रिक्स), एम.एससी (आरडी) डॉ. अनुजा अग्रवाल म्हणाल्या, “राई, शेंगदाणा, सूर्यफूल आणि नारळाचे तेल यांचा विविध संस्कृतींमधील दैनंदिन आहारात पारंपरिकरित्या वापर केला जातो. मात्र, बऱ्याचदा आपण अशा स्थानिक पातळीवरील तेलांना कमी लेखतो.” बाहेर खाताना ते पदार्थ कशा रितीने बनवले गेले आहेत हे जाणून घ्या आणि वारंवार गरम केलेल्या/वापरल्या गेलेल्या तेलातील पदार्थ (समोसा, कचोरी, कटलेट्स, स्प्रिंग रोल्स, तळलेले डिम सम, फ्राइज इ.) टाळा. “रस्त्यावर मिळणाऱ्या पदार्थांसाठी सामान्यपणे सतत तेच तेल वापरलं जातं. त्यामुळे त्या पदार्थांमधील ट्रान्स-फॅटचे प्रमाण वाढू शकते. चटपटीत पदार्थ (भुजिया, नमकीन) आणि बेकरी पदार्थ (केक पफ्स, खारी आणि नानखटाई) या पदार्थांबाबतही ही काळजी घ्यायला हवी,” असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
एक सूज्ञ ग्राहक म्हणून आरोग्यदायी पदार्थांची निवड करणे सोपे आहे. घाईगडबडीत खरेदी करताना काही क्षण थांबा. तुम्ही विकत घेत असलेल्या पदार्थांमधील घटकांची यादी वाचा आणि तुमच्या हृदयासाठी आरोग्यदायी पदार्थांनाच प्राधान्य द्या.