दिवाळीत अधिक वाढतो फॅटी लिव्हरचा धोका, जाणून घ्या कारणं आणि उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:34 AM2024-10-28T11:34:09+5:302024-10-28T11:35:03+5:30
Healthy Liver : या दिवसांमध्ये मिठाई, गोड पदार्थांचं भरपूर सेवन केलं जात. अशात जास्त मीठ, साखर, मैदा आणि फॅट असलेल्या पदार्थांमुळे लिव्हर प्रभावित होतं.
Healthy Liver : लिव्हर शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हरच्या मदतीने अन्न पचन होतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासोबतच इतरही अनेक कामे लिव्हर करतं. अशात लिव्हर निरोगी ठेवण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. मात्र, आपल्या रोजच्याच काही सवयींमुळे लिव्हरच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो.
आता दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दिवसांमध्ये मिठाई, गोड पदार्थांचं भरपूर सेवन केलं जात. अशात जास्त मीठ, साखर, मैदा आणि फॅट असलेल्या पदार्थांमुळे लिव्हर प्रभावित होतं.
लिव्हरमध्ये जर काही बिघाड झाला तर तुमची भूक कमी होते, अचानक वजन कमी होतं, जिभेवर एक थर साचतो, रक्त कमी होतं, बद्धकोष्ठता आणि ठेकर येणं अशी लक्षणं दिसू लागतात. अशात या उत्सवाच्या दिवसात लिव्हर हेल्दी ठेवा आणि त्यात विषारी पदार्थ जमा होऊ देऊ नका. अशात लिव्हरचं कोणत्या पदार्थांनी नुकसान होतं आणि ते हेल्दी ठेवण्यासाठी कशाचं सेवन करावं हे जाणून घेऊया.
तिखट आणि तळलेले पदार्थ टाळा
दिवाळीदरम्यान तिखट आणि तेलकट पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं. ज्यामुळे लिव्हरचं आरोग्य बिघडतं. जे लोक या पदार्थांचं अधिक सेवन करतात. त्यांना फॅटी लिव्हरची समस्या होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला आधीच लिव्हरची समस्या असेल तर तुम्ही केवळ हेल्दी पदार्थांचं सेवन करावं. फार जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाऊ नये.
जास्त मीठ खाणं टाळा
या सीझनमध्ये चटकदार आणि मसालेदार पदार्थांचं सेवन अधिक केलं जातं. पण यात मीठ जास्त असल्याने याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. जेवणात किंवा पदार्थांवर वरून मीठ घेणं जास्त घातक असतं. अशात मिठाचं सेवन कमी करा.
मद्यसेवन टाळा
लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी दारूचं सेवन बंद करा. फेस्टिव सीझनमध्ये दारूचं सेवन वाढतं. पण जर टाळता येत असेल तर मद्यसेवन टाळाच. कारण दारू फॅटी लिव्हरचं सगळ्यात मोठं कारण आहे.
पुरेशी झोप घ्या
उत्सवाच्या दिवसांमध्ये वेगवेगळी कामे भरपूर असतात. अशात अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही. रात्री उशीरापर्यंत जागे राहिल्याने फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. तसेच एका रिसर्चनुसार, दिवसा झोपणाऱ्या लोकांमध्येही फॅटी लिव्हरचा धोका असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे रोज वेळेवर झोपा आणि रात्री साधारण ७ ते ८ तास झोप घ्या.