दुधासोबत जर 'हे' पदार्थ खाल्ले तर होतील गंभीर आजार, अजिबात ट्राय करु नका हे कॉम्बिनेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:10 PM2022-06-01T18:10:59+5:302022-06-01T18:15:01+5:30
या पदार्थांसोबत आणि फळांसोबत दूधाचं (Milk with Fruits) सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
जगभरात आज 1 जून रोजी ‘जागतिक दूध दिवस’ (World Milk Day 2022) साजरा केला जात आहे. चांगल्या आरोग्यासाठी दुधाचं महत्त्व आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील दुधाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. दुधामध्ये कॅल्शिअमसह अनेक पोषक तत्त्वं असतात. दूध शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे भारतातल्या बहुतांश घरांत दुधाचं सेवन केलं जातं. दूध हे आपल्या रोजच्या आहारातला एक महत्त्वाचा घटक आहे. काहींना नुसतं दूध प्यायला आवडतं, तर काही जण वेगवेगळे फ्लेवर टाकलेलं दूध पिणं पसंत करतात.
दूध घालून आपण चहा (Tea), कॉफी पितो, त्याचा मिल्कशेक (Milk Shake) बनवतो. याशिवाय दुधापासून बनलेल्या अनेक पदार्थांचं आपण सेवन करतो. दूध शरीरासाठी चांगलं असलं तरी काही फळांसोबत त्याचं सेवन न करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो. या पदार्थांसोबत आणि फळांसोबत दूधाचं (Milk with Fruits) सेवन करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या संदर्भात 'आज तक'ने वृत्त दिलंय.
केळी आणि दूध एकत्र नको
बरेच लोक केळी आणि दुधाचं (Banana with Milk) एकत्र सेवन करतात. तसंच हे मिश्रण खूप आरोग्यदायी मानतात, परंतु आरोग्यतज्ज्ञांच्या मते केळी आणि दुधाचं एकत्र मिश्रण पचायला खूप वेळ लागतो. हे दोन्ही एकत्र घेतल्याने थकवा जाणवतो. त्यामुळे दूध आणि केळी यांचं मिश्रण करून त्याचं सेवन करू नये.
मासे आणि दूध
दुधाचा गुणधर्म थंड असतो, तर मासे खाल्ल्याने शरीराचं तापमान वाढतं. दूध आणि मासे (Fish with Milk) या मिश्रणामुळे शरीरात असंतुलन निर्माण होतं आणि त्यामुळे शरीरात रासायनिक बदलही होऊ लागतात. मासे आणि दूध सोबत खाल्ल्यास पचनाचे विकार होतात आणि पोट जड होतं, त्यामुळे मासे आणि दुधाचं एकत्र सेवन करू नये.
मुळा आणि दूध
आयुर्वेदानुसार मुळा खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. कारण मुळा उष्ण गुणधर्माचा असतो, त्यामुळे त्याचे दुधासोबत सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते, तसंच पचनाची क्रियाही बिघडते. तज्ज्ञांच्या मते, मुळा किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खाल्ल्यानंतर दोन तासांनी दूध प्यायला हवं.
दुधाबरोबर आंबट पदार्थ
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, दुधात आंबट किंवा आम्लयुक्त पदार्थ मिसळू नयेत. व्हिटॅमिन सी असलेली फळे दुधासोबत खाणं टाळा. त्यामुळे दूध पचायला वेळ लागतो. लिंबू किंवा कोणतंही आंबट चवीचं फळ दुधासोबत खाल्ल्यास कन्जेशन, सर्दी, खोकला, पुरळ आणि अॅलर्जीदेखील होऊ शकते.
फळांसह दुधाचं सेवन करू नये
काही फळांसह दूध पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. दूध पोट साफ करण्याचं काम करतं, तर फळांमध्ये नैसर्गिक मीठ आणि पाणी असतं, जे किडनी (Kidney) स्वच्छ ठेवण्याचं काम करतं. ते एकत्र घेतल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात आणि शरीरातील विषारी पदार्थ वाढतात. त्यामुळे उलट्या आणि जुलाबाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे त्याचं एकत्र सेवन करू नये.
तुम्ही यापैकी कोणत्याही पदार्थांचं किंवा फळांचं सेवन दुधासोबत करत असाल, तर ते टाळा. कारण त्यामुळे आरोग्याच्या अनेक अडचणी उद्भवतात.