पावसाळ्यात 'अशी' घ्या पायांची काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 02:19 PM2018-07-07T14:19:02+5:302018-07-07T14:19:21+5:30
पावसाळा सुरू झाला असून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मुख्यतः पावसात भिजताना केस आणि त्वचेसोबतच पायांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते.
पावसाळा सुरू झाला असून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळ्यामध्ये आपल्याला शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मुख्यतः पावसात भिजताना केस आणि त्वचेसोबतच पायांचीही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा पायाच्या वेगवेगळ्या तक्रारींना सामोरे जावे लागेल. ज्यामध्ये पायाला खाज येणे, अॅलर्जी आणि सूज येणे यांसारख्या तक्रारी भेडसावण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात पायांची विशेष काळजी घेणे आणि निगा राखणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात पावसाळ्यात पायांची निगा राखण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी...
कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा
पायांचा अॅलर्जी किंवा अन्य त्वचेच्या तक्रारींपासून बचाव करण्यासाठी ते गरम पाण्याने धुवावेत. झोपण्यापूर्वी पाय 15 ते 20 मिनिटांपर्यंत कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत. त्यानंतर स्वच्छ टॉवेलने पाय पूसून घ्यावेत. पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब अॅन्टिसेप्टिक लिक्विडही टाकू शकता.
नखे स्वच्छ ठेवा
तसे पाहता नखे नेहमी नीटनेटकी आणि स्वच्छ असणे गरजेचे आहे. परंतु पावसाळ्यामध्ये नखांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे पायांना अॅलर्जी होण्याचा धोका नसतो. पायांची नखे वाढलेली असल्यास त्यामध्ये घाण आणि बॅक्टेरिया साठण्याची शक्यता अधिक असते. नखे कापतानाही ती सरळ कापली जातील याची काळजी घ्यावी.
मॉइश्चरायझरचा वापर करावा
पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे मॉइश्चरायझरची गरज नाही असे समजत असाल, तर असा विचार करणे चुकीचे आहे. पावसाळ्यात स्किन अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पायांची काळजी घेत असताना मॉइश्चरायझरचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. पायांची डेथ स्किन काढण्यासाठी तसेच अॅलर्जीसाठीही मॉइश्चरायझरचा वापर हा उत्तम उपाय असतो.
पेडिक्योर
पावसाळ्यामध्ये पायांची काळजी घेण्यासाठी पेडिक्योर करणेही फायदेशीर असते. त्यामुळे पाय सुरक्षित आणि स्वच्छ ठेवण्यास मदत होते. पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन, बॅक्टेरियांमुळे अॅलर्जी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे घराबाहेर जाताना सॅन्डल्सपेक्षा शूजना अधिक प्राधान्य देणे गरजेचे असते.