तुम्हाला तोंडाचा अल्सर माहीत असेल पण पोटाचा माहीत आहे का? जाणून घ्या लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 10:38 AM2019-08-10T10:38:50+5:302019-08-10T10:44:56+5:30
तोंडात अल्सर होतो हे सर्वानाच माहीत आहे. पण तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो हे मात्र फार कमी लोकांना माहीत असतं. पोटाच्या अल्सरमध्ये पोटात फोडं येतात आणि त्याचे घावही तयार होतात.
तोंडात अल्सर होतो हे सर्वानाच माहीत आहे. पण तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो हे मात्र फार कमी लोकांना माहीत असतं. पोटाच्या अल्सरमध्ये पोटात फोडं येतात आणि त्याचे घावही तयार होतात. पोटाच्या अल्सरची समस्या ही अनियमित लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे होते. जास्त वेळासाठी तुमच्या खाण्या-पिण्यात अनियमितता असेल तर पोटात फोडं होतात आणि ते फुटल्यावर त्याच्या जखमा तयार होतात. यालाच पोटाचा अल्सर म्हटलं जातं. पोटाच्या अल्सरची समस्या कधी कधी फार घातक ठरू शकते.
पोटातील अल्सर हे छोट्या आतड्यांच्या सुरूवातीच्या भागात किंवा म्यूकलवर होणारे फोडं असतात. अल्सर होण्याचं प्रमुख कारणं पोटात अॅसिडचं प्रमाण वाढणं, चहा, कॉफी, सिगारेट आणि मद्यसेवन हे आहेत. त्यासोबतच जास्त आंबट खाणे, मसालेदार खाणे आणि गरम पदार्थ खाणे यानेही पोटात अल्सर होतात.
काय आहेत याची लक्षणे?
१) पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे - अल्सरची समस्या झाल्यावर पोटाच्या वरच्या बाहेरील भागात वेदना होऊ लागतात. असं बघितलं जातं की, अल्सरमध्ये जेवण केल्यावर पोटात वेदना सुरू होतात. तसेच पोट रिकामं असेल तरी वेदना होतात. या स्थितीत अन्न नलिकेच्या खालच्या भागात फोडं येतात. कधी-कधी अन्न नलिकेला छिद्रही पडतं.
२) अॅसिड तयार होणं - आपण जेव्हा काही खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. याने अन्न पचन होत असतं. कधी कधी पोट खराब झाल्यावर हे अॅसिड वर अन्न नलिकेत जातं आणि जळजळ वाटू लागते. याचा प्रभाव घशात, दातांवर, श्वासांवर पडू लागतो. यानेच तोंडातही फोडं येतात.
३) रक्ताची उलटी होणे - अल्सरमध्ये असं आढळतं की, उलटी होते किंवा उलटीसारखं वाटतं. जेव्हा अल्सर वाढतो तेव्हा त्रास आणखी वाढतो. कधी कधी उलटीतून रक्तही येऊ शकतं. अशात विष्ठेचा रंगही काळा होतो.
४) अॅसिडिटीची समस्या - अल्सरमुळे छातीत दुखण्याची समस्याही होते. या वेदना अॅसिडिटी रिफ्लेक्शनमुळे होतात. हृदयात होणाऱ्या वेदना या छातीच्या वरच्या भागात होतात आणि कधी कधी अॅसिडिटीमुळे त्याच जागी वेदना होतात. त्यामुळे यात फरक करणे कठीण होऊन बसतं.
५) वजन कमी होणे - पोटाच्या अल्सरने ग्रस्त लोकांचं वजन फार वेगाने कमी होऊ लागतं. याचं कारण म्हणजे अल्सर झाल्यार व्यक्ती खाण्याबाबत उदासीन होतो. त्यामुळे वजन कमी होऊ लागतं. त्यासोबतच अन्न पचनही होत नसल्याने वजन कमी होऊ लागतं.