ना कोणतंही लक्षण...ना कोणता त्रास; तरीही या लोकांना अचानक येऊ शकतो हार्टअटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 09:21 PM2023-03-30T21:21:33+5:302023-03-30T21:23:08+5:30
देशात गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार आणि हार्टअटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून आली आहे.
नवी दिल्ली-
देशात गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार आणि हार्टअटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून आली आहे. हृदयाशी निगडीत समस्या या आता काही कोणत्याही एका वयोगटापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या हृदविकाराच्या समस्यांना निमंत्रण देणाऱ्या ठरतात. याशिवाय एथेरोस्क्लेरोसिस देखील एक अशीच समस्या आहे की ज्यानं लोक अचानक हार्टअटॅकचे शिकार होतात. यात हृदयाच्या धमन्यांमध्ये कडकपणा येतो आणि त्यामध्ये रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
डेन्मार्कमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये आढळून आलंय की एथेरोस्क्लेरोसिसचा त्रास तुम्हाला असेल तर हार्टअटॅक येण्याचा धोका आठ पटीनं अधिक असतो.
एथेरोस्क्लेरोसिस का आहे इतकं धोकादायक?
एथेरो म्हणजे फॅट आणि स्क्लेरोसिस म्हणजे जमा होणं. जर हृदयाच्या धमन्यांमध्ये फॅट किंवा कोलेस्ट्रॉल जमा झालं तर जी परिस्थिती निर्माण होते त्याला एथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. यात धमण्या ब्लॉक होतात आणि हार्टअटॅकचा धोका वाढतो. एथेरोस्क्लेरोसिस जर यकृतात झाला असेल तर त्याला लीवर फिलियर आणि किडनीत झाला तर त्याला किडनी फेलियर म्हटलं जातं. पण या आजाराची सर्वात मोठी अडचण म्हणजे याची लक्षणं लगेच कळून येत नाहीत आणि यामुळे बहुतांश रुग्णांना या आजाराबाबत माहिती मिळणं कठीण होऊन जातं.
डेन्मार्कच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या माहितीनुसार या परिस्थितीत हळूहळू धमण्यांमध्ये फॅट जमा होण्यास सुरुवात होते ज्यामुळे रक्तप्रवाहात खूप अडचणी निर्माण होतात.
कोणतेही संकेत न देता होता आजार
बहुतांश लोकांमध्ये या रोगाची लक्षणं दिसून येत नाहीत. पण हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका यामुळे वाढतो. एथेरोस्क्लेरोसिसचा हा आजार कमी वयातच सुरू होतो पण त्याची लक्षणं बराच काळ लोटल्यानंतरही दिसून येत नाहीत. जोवर संबंधित व्यक्तीला हार्टअटॅक येत नाही तोवर काहीच लक्षणं जाणवत नाहीत, असं एनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
संशोधनात धक्कादायक माहिती उघड
डेन्मार्कच्या कोपहेगनमधील संशोधकांनी ९ हजाराहून अधिक लोकांचं परिक्षण केलं होतं. ज्यात ४० हून अधिक वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. हे लोक हृदयाशी संबंधित कोणत्याही आजारानं पीडित नव्हते. संशोधनात त्यांनी कंप्युटेड टोमोग्राफी एंजियोग्राफीचा वापर केला होता. ज्यात त्यांनी लोकांच्या हृदय आणि धमण्यांचा संपूर्ण एक्स-रे केला. धक्कादायक बाब अशी की यात ४६ टक्के लोकांमध्ये सबक्लिनिकल कोरोनरी एथेरोस्क्लेरोसिसची समस्या दिसून आली होती.