शुक्राणू वाढीसाठी पुरुषांना घरातच करता येणार 'हा' रामबाण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 12:18 PM2023-01-28T12:18:00+5:302023-01-28T12:22:02+5:30
वंध्यत्व म्हटले की त्याला स्त्रीच जबाबदार आहे, अशी आपल्याकडे धारणा आहे...
पुणे : वंध्यत्वाची समस्या अलीकडे वाढलेली दिसते. उशिराने हाेणारे लग्न, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, कामाचे बदललेले स्वरूप, व्यायामाचा अभाव, झाेपेचा अभाव आदी कारणांमुळे वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी जाेडप्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
वंध्यत्वाची कारणे काय?
उशिरा हाेणारे विवाह हे वंध्यत्वाचे माेठे कारण आहे. मद्यसेवन, ताणतणाव, जागरण, लॅपटाॅप मांडीवर ठेवून काम करणे ही देखील कारणे आहेत. तर स्त्रियांनी तिशी ओलांडली असेल तर गर्भधारणेला अडचणी येतात. यामध्ये बीज तयार न हाेणे, बीज परिपक्व नसणे, ताणतणाव, व्यसन व लठ्ठपणा ही कारणे आहेत.
काळजी काय घ्याल?
शक्यताे पंचवीशी ते तिशीदरम्यानच्या वयाेगटात बाळाचे प्लॅनिंग जाेडप्यांनी करायला हवे. जर शक्य नसेल तर किंवा तिशीनंतर विवाह झाल्यास जाेडप्यांनी बाळ हाेण्याचा पर्याय पुढे ढकलू नये. तसे करायचे झाल्यास स्त्रियांनी शरीरातील अंड्यांचा साठा किती आहे ते पहावे व ते फ्रीज करू शकता. तसेच विवाहनंतर वर्षानंतरही बाळ न झाल्यास स्त्रीराेगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व त्यानुसार तपासण्या कराव्यात.
वंध्यत्वाला पुरुषही जबाबदार
वंध्यत्व म्हटले की त्याला स्त्रीच जबाबदार आहे, अशी आपल्याकडे धारणा आहे. परंतु, काहीवेळा पुरुषही जबाबदार असतात. यामध्ये पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असणे, संख्या पुरेशी असली तरी त्यांची हालचाल कमी असणे ही पुरुषांबाबतची कारणे महत्त्वाची आहेत.
...तर डॉक्टरांशी संपर्क साधा
लग्नानंतर काेणत्याही गर्भधारणा प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा उपयाेग न करता एक वर्ष मूल न झाल्यास त्याला वंध्यत्व असे संबाेधले जाते. स्त्रीराेगतज्ज्ञ तथा वंध्यत्व तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सुचविल्यानुसार तपासणी व उपचार घ्यावेत.
उशिराने हाेणारे लग्न, स्त्रियांमध्ये गर्भाशयाला गाठ येणे, वाढते प्रदूषण, व्यायामाचा अभाव याचा परिणाम हाेताे. तसेच जंकफुडचे सेवन, ट्रान्स फॅक्ट, सिगारेट, दारू व्यसनांमुळे पुरुषांच्या शुक्राणूंवर परिणाम वाढताे. महिलांमध्ये गर्भनलिका बंद हाेतात व ॲबाॅर्शनमुळे गर्भनलिका बंद हाेण्याचा धाेका वाढताे. हे टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये याेग्य आहार, स्ट्रेस नकाे, व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, आठ तासांची झाेप, पुरुषांनी शुक्राणूंच्या वाढीसाठी शक्यताे थंड पाण्यात अर्धा तास राहणे गरजेचे आहे.
- डाॅ. सुप्रिया पुराणिक, आयव्हीएफ तज्ज्ञ