'या' एका फळाचा वापर करा आणि त्वचेवरील डाग मुरुमांना विसरा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:43 AM2022-11-06T10:43:31+5:302022-11-06T10:45:38+5:30
कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे.
हवेतील प्रदुषण किंवा वेळीअवेळी जेवण याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही होत असतो. तसेच ऋतुप्रमाणे त्वचा कोरडी किंवा तेलकट होत असते. म्हणून सतत त्वचेची काळजी घेत राहणे आवश्यक आहे. थंडीत रात्री मॉइश्चरायझर लावून झोपले तर त्वचेला आराम मिळतो. त्वचा कोरडी पडत नाही. तसोच रोजच्या आहारामध्येही पोषक तत्वे असतील तरी त्वचा उजळून येते. कोणत्याही आजारावर फळं खाणे म्हणजे रामबाण उपायच आहे. फळं मुळातच पोषक आहार आहे. मग तुमच्या त्वचेसाठी कोणते फळ फायदेशीर असेल तर ते म्हणजे पपई.
पपईचे फायदे काय?
पपई मध्ये पुरेपुर व्हिटॅमिन आणि मिनरल आहेत. ही गुणधर्मे तुमची त्वचा निरोगी ठेवते. पपईत असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. व्हिटॅमिन ए मुळे त्वचेच्या मृत पेशींची समस्या दूर होते. तर पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे त्वचेवरील टॅन निघून जाते.
अनेकदा त्वचेवर येणारे डाग, रॅशेस सुद्धा पपईमुळे नाहीसे होतात.यामधील अॅंटीऑक्सीडेंट्समुळे त्वचा स्वच्छ होते.
पपईचा फेस पॅक
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पपईच्या पॅक चा वापर केला जातो. फेसपॅकमुळे त्वचा हायड्रेट राहते. मृत त्वचेसाठी तर फेसपॅक खूपच उपयोगी आहे.
पपई मध आणि दूध यांचे मिश्रण त्वचेवर लावल्यास त्वचा उजळून येते. विशेषत: त्वचेवर असणारे डाग, मुरुम कमी होतात.
पपईबरोबर कॉफी पावडर लावल्यानेही त्वचा मुलायम होण्यास मदत होते.पपई आणि कॉफी पावडर मिसळून लावा आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवा. यामुळे त्वचेवरील टॅनिंग जाण्यास मदत होते.
पपईचा गर डार्क सर्कल्स दूर करण्यात खूपच उपयोगी आहे. कमी झोप, सतत स्क्रीनसमोर असल्याने अनेकांना डार्क सर्कल्सची समस्या आहे. पपईचा गर त्यावर लावून काही वेळाने चेहरा धुवा. असे नियमित केल्यास काही दिवसातच फरक दिसून येईल.