डोकेदुखी दूर करण्यासाठी कॉफी पिताय; थोडं थांबा आणि हे वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 02:38 PM2019-08-11T14:38:26+5:302019-08-11T14:43:58+5:30
एका दिवसात तीन कप किंवा त्यापेक्षा जास्त कॉफी पिणं मायग्रेनच्या रूग्णांची समस्या वाढू शकते, असं केला संशोधनातून सिद्ध झालं आहे.
(Image Credit : https://www.scienceofmigraine.com/)
एका दिवसात तीन कप किंवा त्यापेक्षा जास्त कॉफी पिणं मायग्रेनच्या रूग्णांची समस्या वाढू शकते, असं केला संशोधनातून सिद्ध झालं आहे. यूएसमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली की, मायग्रेनच्या समस्येने जगभरातील अनेक तरूण त्रस्त असून मायग्रेन हा जगभरातील तिसरा सर्वात कॉमन आजार आहे. मायग्रेन असणाऱ्या व्यक्तीला डोकेदुखीव्यतिरिक्त मूड स्विंग्स, अस्वस्थ वाटणं, प्रकाश किंवा जास्त आवाजाने त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनामध्ये असं सांगितलं आहे की, कॅफेन असणाऱ्या पेय पदार्थांमुळे मायग्रेन असणाऱ्या व्यक्तींना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
हार्वडमधील टी एच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे रिसर्चर एलिझाबेथ यांनी सांगितले की, ज्यांना मायग्रेनच्या समस्येचा त्रास सहन करावा लागतो. त्यांना एक किंवा दोन कप कॅफेन असणारे ड्रिंक दिले गेले तर त्यांना डोकेदुखीचा त्रास होत नाही.
दरम्यान, तीन किंवा त्यापेक्षा जास्त कप कॅफेन असणाऱ्या पदार्थांचं सेवन केल्याने त्याचदिवशी मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी वाढू शकते. पुढे बोलताना एलिझाबेथ यांनी सांगितले की, 'झोपेच्या कमतरतेमुळेही मायग्रेनचा धोका वाढतो. तेच कॅफेनचा रोल थोडा वेगळा असतो. मायग्रेन कंट्रोल करण्यासोबतच वाढविण्यासाठीही कॅफेन मदत करतं.
मायग्रेन असणाऱ्या व्यक्तीवर कॅफेनचा नेमका काय परिणाम होणार हे कॅफेनचं प्रमाण आणि त्याचं सेवन नेमकं किती वेळा करण्यात येणार आहे, यावर अवलंबून असतं. परंतु, काही संशोधनामध्ये कॅफेन असणाऱ्या पेय पदार्थांचे जास्त सेवन केल्याने मायग्रेनचा त्रास वाढत असल्याचेही समोर आले आहे.
एका संशोधनामध्ये 98 तरूणांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांना मायग्रेनच्या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यांनी सहा आठवड्यांपर्यंत सकाळ आणि संध्याकाळी इलेक्ट्रिक डायरी मेनटेन केली होती. सहभागी लोकांनी प्रत्येक दिवशी प्यायलेला चहा, सोडा आणि एनर्जी ड्रिंकच्या सेवनाच्या नोंदी करून ठेवल्या. त्याचबरोबर त्यांना होणाऱ्या डोकेदुखीबाबतही नोंदी केल्या. याव्यतिरिक्त कॅफेन न घेतलेल्या दिवसांच्याही नोंदी करण्यात आल्या. रिसर्चमध्ये असं आढळून आलं की, एक किंवा दोन कप कॅफेन असणाऱ्या पेय पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये कोणतीही समस्या आढळून आली नाही. परंतु, दोन किंवा त्यापेक्षा जास्त कप कॅफेन घेणाऱ्या लोकांमध्ये अनेक समस्या दिसून आल्या. दरम्यान, ज्या व्यक्ती कॅफेनचं सेवन फार कमी करत असत, त्यांना एक किंवा त्यापेक्षा जास्त कॅफेनच्या सेवनाने त्रास होऊ लागला.
टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं.