स्वाइन फ्लूमध्येही असतात तीन प्रकार; जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:23 PM2019-01-30T12:23:12+5:302019-01-30T12:23:48+5:30
सध्या देशभरात स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत.
(Image Credit : Laois Today)
सध्या देशभरात स्वाइन फ्लू सारख्या गंभीर आजाराने थैमान घातलं आहे. ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? स्वाइन फ्लूचेही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानुसार या आजाराचे तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रूग्णांवर लवकरात लवकर उपचार करणं सोप व्हावं यासाठी सरकार आणि हेल्थ ऑर्गनायझेशनने ही विभागणी केली आहे. जाणून घेऊया या तीन वेगवेगळ्या गटांबाबत...
गट - A
ताप, खोकला, सर्दी, अंगदुखीचा त्रास होणं आणि सतत थकवा जाणवणं ही माइल्ड स्वाइन फ्लूची लक्षणं आहेत. स्वाइन फ्लूमध्ये करण्यात येणारे उपचार हे त्याच्या लक्षणांवर अवलंबून असतात. अशा लक्षणांमध्ये टॅमीफ्लू औषधं घेण्याची किंवा उपचार करण्याची गरज नसते. सध्याचे वातावरण स्वाइन फ्लूची साथ पसरण्यासाठी अनुकूल आहे. यामुळेच स्वाइन फ्लूच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या आजाराचा संसर्ग श्वासामार्फत होतो. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला तर संपूर्ण कुटुंबाला हा आजार होऊ शकतो. परंतु जर तुमच्यामध्ये या गटातील लक्षणं दिसून येत असतील तर घाबरण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांनी किंवा किरकोळ औषधांनी या समस्या तुम्ही दूर करू शकता.
गट - B
या गटातील रूग्णांमध्ये माइल्ड स्वाइन फ्लूच्या लक्षणांव्यतिरिक्त खूप ताप आणि घशामध्ये सतत होणाऱ्या वेदनांचा सामना करावा लागतो. याव्यतिरिक्त रूग्णांमध्ये माइल्ड स्वाइन फ्लूच्या लक्षणांसोबतच हाय रिस्क कंडीशन कॅटिगरी असेल तर त्या रूग्णाला स्वाइन फ्ल्यूसाठी असलेलं औषध टॅमीफ्ल्यू देण्यात येते. हाय रिस्क कॅटगरिमध्ये छोटी मुलं, गर्भवती महिला, 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती, हृदय विकाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती याव्यतिरिक्त किडनीचे आजार, डायबिटीज, कॅन्सरने पीडित असणाऱ्या लोकांचाही समावेश होतो.
गट - C
या गटामधील लोकांमध्ये स्वाइन फ्लूच्या गट A आणि B मध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांसोबतच इतर गंभीर लक्षणंही दिसून येतात. जसं श्वास घेण्यासाठी त्रास होणं, छातीमध्ये वेदना होणं, ब्लड प्रेशर सतत कमी-जास्त होणं, नखं पिवळी पडणं यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. ज्या लोकांमध्ये 'C' गटातील लक्षणं आढळून येतात. त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज असते. अशा रूग्णांना एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात येतं. तसेच त्याना स्वाइन फ्लूचं औषध टॅमिफ्लू देण्यात येतं आणि वेळोवेळी त्यांच्या तपासण्याही करण्यात येतात.