Corona Vaccine : कोरोनाची लस सकाळच्या तुलनेत दुपारी घेणे जास्त प्रभावी, संशोधनातून दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 03:33 PM2021-12-09T15:33:41+5:302021-12-09T15:35:30+5:30
Corona Vaccine : कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. याच लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधनातून तज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतासह जगभरात ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आतापर्यंत 57 देशांमध्ये आढळलेले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. याच लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधनातून तज्ज्ञांनी मोठा दावा केला आहे.
कोरोनाची लस सकाळच्या तुलनेत दुपारी घेतल्यास जास्त प्रभावी असल्याचे म्हटले आहे. तसेच, दुपारी अँटीबॉडीचे प्रमाण जास्त असते. जर्नल ऑफ बायोलॉजिकल रिदममध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले की, 24 तासांत शरीरातील अनेक घटनाक्रम बदलत असतात, ज्यात संसर्गजन्य रोग आणि लसीकरणाची प्रक्रियेचा सुद्धा समावेश आहे.
मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल (MGH) मधील सह-वरिष्ठ लेखिका एलिझाबेथ क्लेरमन म्हणाल्या, "एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सकाळच्या तुलनेत दिवसा SARS-CoV-2 लसीकरणाच्या प्रति प्रतिकारशक्तीला अधिक प्रभावित करते." संशोधकांचे म्हणणे आहे की, काही रोगांची लक्षणे आणि अनेक औषधांचा परिणाम दिवसा अधिक प्रभावी असतो. तसेच, फुफ्फुसाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये अनेकदा लक्षणे अधिक असतात, त्यांच्यावर औषधांचा प्रभाव दुपारी अधिक असतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.
2,190 आरोग्य कर्मचाऱ्यांची चाचणी
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, इन्फ्लूएंझा लसीकरण घेतलेल्या वृद्ध पुरुषांच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेव्हा त्यांना दुपारी लसीकरण करण्यात आले, तेव्हा त्यांच्यात उच्च अँटीबॉडीची कमतरता होती. युनायटेड किंगडममध्ये हे संशोधन 2,190 आरोग्य कर्मचाऱ्यांवर SARS-CoV-2 लसीकरणाची चाचणी करण्यात आली, यावेळी सकाळच्या तुलनेत दुपारी दिलेल्या डोसमध्ये अँटीबॉडीज जास्त तयार झाल्याचे दिसून आले.
ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढली चिंता!
कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरात ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी सांगितले की, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण आतापर्यंत 57 देशांमध्ये नोंदविले आहेत. तसेच, झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे रूग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतातही परिस्थिती चिंताजनक!
भारतासह जगभरात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली आहे. भारतातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी देशात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चार दिवसांत हा आकडा 20 च्या पुढे गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.