किचनच्या सिंकमधून येणाऱ्या दुर्गंधीने हैराण आहात, वापरा हे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 02:40 PM2018-08-25T14:40:54+5:302018-08-25T14:46:58+5:30
अनेकदा महिला किचनच्या सिंकमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे वैतागलेल्या असतात. घरात आल्या आल्या ही सिंकमधून येणारी दुर्गंधी थेट नाकात जाते.
अनेकदा महिला किचनच्या सिंकमधून येणाऱ्या दुर्गंधीमुळे वैतागलेल्या असतात. घरात आल्या आल्या ही सिंकमधून येणारी दुर्गंधी थेट नाकात जाते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी बाजारातून वेगवेगळी महागडी उत्पादने आणली जातात. पण हा खर्च टाळता येऊ शकतो. तुमच्या घरातही ही समस्या असेल तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊ या सोप्या टिप्स....
लिंबू
सिंकमध्ये अनेकदा भांडी घासताना वेगवेगळे पदार्थ अडकलेले असतात. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येते. पण ही दुर्गंधी लिंबूच्या माध्यमातून तुम्ही दूर करु शकता. यासाठी लिंबू आणि मिठाची एक घट्ट पेस्ट तयार करा. या पेस्टने सिंक स्वच्छ करा. असे केल्याने सिंकही चमकदार होईल आणि त्यातून येणारी दुर्गंधीही दूर होईल.
व्हिनेगर
जशी भांड्यांची स्वच्छता करणे गरजेचे असते तशीच सिंकची स्वच्छताही महत्त्वाची असते. सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. भांडी घासल्यानंतर व्हिनेगर आणि ब्रशच्या मदतीने सिंक चांगले घासा. याने सिंकमधून येणारी दुर्गंधी दूर होईल.
बेकिंग सोडा
सिंक चमकवण्यासाठी आणि त्यातून दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडाही वापरला जाऊ शकतो. यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा टाका आणि ५ मिनिटांनंतर सिंक घासा. याने त्यातून येणारी दुर्गंधी दूर होईल.