ओवरइटिंग टाळण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी, नाही तर पडेल महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 10:32 AM2019-01-09T10:32:23+5:302019-01-09T10:38:20+5:30
हिवाळा सुरु झाला की, वेगवेगळे सण-उत्सव आणि लग्नांचाही सीझन सुरु होतो. तसेच या ऋतूमध्ये खाण्या-पिण्याचीही चांगलीच चंगळ असते.
(Image Credit : capitalfm.co.ke)
हिवाळा सुरु झाला की, वेगवेगळे सण-उत्सव आणि लग्नांचाही सीझन सुरु होतो. तसेच या ऋतूमध्ये खाण्या-पिण्याचीही चांगलीच चंगळ असते. अशात अनेकदा ओव्हरइटिंग सुद्धा होतं. ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या दृष्टीने हिवाळा हा चांगला मानला जातो. त्यामुळे अनेकजण खाण्याबाबत वेगवेगळे सल्ले देतात. पण ते पाळावे याचीही एक प्लॅनिंग असायला हवा. अशात आम्ही तुम्हाला ओव्हरइटिंगपासून बचाव कसा करावा याच्या काही टिप्स सांगणार आहोत.
छोट्या प्लेटमध्ये खा
जेवण नेहमी छोट्या प्लेटमध्ये घ्यावे. जेवण कराल तेव्हा शांततेने आणि हळूहळू चाऊन खावे. लक्ष प्लेटवर ठेवा. अनेकजण टीव्हीसमोर बसून जेवण करतात आणि त्यांचं लक्ष जेवणापेक्षा जास्त हे टीव्हीकडेच असतं. अशात जास्त खाल्लं जातं. तर काही लोक फोनवर बोलता बोलता, पुस्तक वाचताना किंवा कम्प्युटरवर काम करताना खातात, याला माइंडलेस इटिंग म्हणतात. आहारात अर्धा प्लेट सलाद आणि अर्ध्या प्लेटमध्ये जेवण ठेवा.
जेवताना मंचिंग नको
जेव्हाही अस्सल देशी पदार्थ खायला मिळतात तेव्हा स्वत:वर कंट्रोल ठेवणं कठिण होऊन बसतं. एका पकोडा किंवा समोस्याने काय होईल, असा विचार करुन फार जास्त खाल्लं जातं. पण या छोट्या छोट्या गोष्टींमुळे वजन वाढू शकतं भजी, समोसे, चटपटीत पदार्थ, बिस्कीट आणि मंचिंग म्हणजे अधेमधे सतत काहीतरी खात राहणं या गोष्टींमुळे तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे नाश्ता आणि जेवणाच्या अधेमधे मंचिंग करु नका.
जेवणाआधी पाणी किंवा सूप
काही सणवार असले की, जेवण जास्त खाल्लं जाण्याची भीती अधिक असते. अशात ओव्हरइटिंगपासून वाचण्यासाठी जेवणाच्या अर्धा तासआधी एक ग्लास पाणी प्यावे किंवा एक छोटी वाटी सूप प्यावे. याने पोट आधीच भरलं जातं आणि भूक कमी लागते. सोबतच जे खाणार आहात ते शांततेने आरामात खावे. घाई करुन नुकसान तुमचेच होईल.
कॅलरीच्या गरजेनुसार खावे
खाताना कॅलरीचं संतुलन कायम ठेवणे गरजेचं आहे. पोटभर खाल्ल्यानंतर त्यापासून तयार झालेल्या कॅलरी बर्न केल्या नाहीत आणि त्यानंतर पुन्हा पोटभर जेवण केल्यास फॅट वाढतात. जितक्या कॅलरींची गरज आहे, तितकच खावे. जर तुम्ही संतुलन ठेवाल तर वजन वाढणार नाही. म्हणजे आधी जर जास्त जेवण केलं असेल तर नंतर जेवताना कमी खावे.
रागाने किंवा तणावात खाण्याची सवय नको
महिला रागाच्या भरात अनेकदा जास्त खातात. अशावेळी आपल्या रागाला शांत ठेवा आणि खाण्या-पिण्याची काळजी घ्या. अनेकदा असं होतं की, व्यक्ती अधिक तणावात असते आणि त्याची खाण्याची इच्छा तीव्र होते. खासकरुन गोड आणि चटपटीत खाण्याचं खूप मन होतं. ही स्ट्रेस इटिंग त्या लोकांमध्ये अधिक असते, ज्यांना लवकरात लवकर तणावातून बाहेर यायचं असतं. त्यामुळे तणावात असताना काहीही खाण्याची सवय पाडून घेऊ नका.
जेवण व्यवस्थित चाऊन खावे
ज्या मुली अन्न हळूहळू आणि चांगल्याप्रकारे चाऊन खातात, त्या सामान्य मुलींच्या तुलनेत ७० टक्के कॅलरी उपयोगात आणतात. अन्न चांगल्याप्रकारे चावल्याने गरज असेल तेवढंच जेवण केलं जातं. तसेच यानेच हार्मोन्स तयार होतात, जे खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करतात. सोबतच चाऊन चाऊन खाल्ल्याने ओव्हरइटिंगही होत नाही.