तुमच्या हृदयाचे आरोग्य अवलंबून आहे तुमच्या 'या' सवयींवर, वेळीच योग्य ते बदल करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 02:59 PM2021-08-02T14:59:38+5:302021-08-02T15:06:54+5:30
आपल्या हृदयाची(Heart) योग्य ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. यामुळे वेळीच हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.
जगभरात हृदयरोग असणाऱ्या लोकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वर्ल्ड हार्ट फेडरेशन नुसार ५५ वर्षाच्या आधी जर तुम्हाला हृदयाशी संबधित आजार असतील आणि या वयाच्या आतच तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा हार्ट फेल्युअरच्या समस्येचा समाना करावा लागत असेल तर तुमच्या कुटुंबातही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. याचा अर्थ असा की तुमच्या घरात ५५ वर्षाच्या आतील व्यक्ती जर हृदयाच्या समस्येने ग्रासित असेल तर तुम्हालाही हृदयाशी संबधित रोगांचा सामना करावा लागू शकतो.
तसेच या कोरोना महामारीच्या काळातही हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होतो आहे. अशा व्यक्तींनी कोरोनाकाळात घराबाहेर पडूच नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे याकाळात आपल्या हृदयाची(Heart) योग्य ती काळजी घेणे आपल्याच हातात आहे. यामुळे वेळीच हृदयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या काही गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.
पोषक आहार
प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर, जंक फूडचा वापर वाढत असल्याने आपली जीवनशैली (Lifestyle) अनियमित बनत चालली आहे. ताज्या भाज्या, घरगुती अन्न आपल्या हृदय आणि आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणार्या भाज्या, धान्य, प्रथिनेयुक्त खाद्य पदार्थ यांचा आहारात समवेश करावा. खाद्य तेलाचा वापर कमी प्रमाणात करावा. आपल्या आहारात दूध आणि दुग्ध उत्पादनांचा देखील प्रमाणात समावेश करावा. सकस अन्न पदार्थ पोटात गेल्याने शरीर तंदुरुस्त होतेच, पण हृदय (Heart) निरोगी राखण्यासदेखील मदत होते.
ताण-तणाव नियोजन
या कोरोना काळात प्रत्येक जण तणावपूर्ण आयुष्य (lifestyle) जगत आहे. एकीकडे संसर्गाची भीती आहे, तर दुसरीकडे, नोकरी गमावणे, आर्थिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे तणाव वाढत आहे. या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. परंतु, या काळात जर आपल्याला तणाव येत असल्यास त्याचे वेळीच नियोजन करावे. मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी कराव्यात. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह कॉलवर, व्हिडिओ चॅटवर गप्पा माराव्या. आपल्याला काय वाटते, याबद्दल त्यांना सांगावे, जेणेकरुन या तणावातून मुक्त होण्यास तुम्हाला मदत होईल. वाढत्या तणावाचा मन आणि शरीरासह हृदयावरदेखील गंभीर परिणाम होत असतो.
शारीरिक व्यायाम
दिवसातून किमान ४५ मिनिटे व्यायाम करणे किंवा चालणे शरीर सुधृढ ठेवण्यास मदत फायदेशीर ठरते. सध्या कोरोनामुळे जरी घराबाहेर जाता येत नसले, तरी घरातच किमान १० हजार पावले चालून जितका व्यायाम होती, तितकी शारीरिक कसरत करावी. योग-प्राणायाम या सारख्या व्यायामांमुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी संतुलित राहते. परिणामी तंदुरस्त शरीरासह हृदयदेखील (Heart) निरोगी बनते.
पुरेशी झोप
हृदय निरोगी ठेण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. झोपेचा अभाव हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका वाढवतो. आजकाल वर्क फ्रोम होम सुरू असल्याने बरेच लोक दुपारी झोप काढतात आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही आणि वेगवेगळ्या तक्रारी उद्भवायला लागतात. रात्री कमीतकमी ७-८ तास झोप मिळाल्यास, दिवसा शरीर-मन तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत होते. याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो.
नियमित तपासणी
वरील सर्व गोष्टींचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहेच. परंतु, याबरोबर हृदयाची संपूर्ण निरोगीता सुनिश्चित करण्यासाठी नियमित तपासणी करणे देखील आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार हृदयाची नियमित तपासणी करणे अधिक महत्त्वाचे असते. म्हणूनच, दर सहा महिन्यांनी तपासणी करावी. हृदयासंबंधित कुठलीही तक्रार किंवा समस्या वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.