पुरुषांना 'या' कारणांमुळे हार्ट अटॅकचा धोका जास्त, घ्या 'अशी' काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:45 PM2022-04-20T15:45:33+5:302022-04-20T15:49:53+5:30
हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून काही चांगल्या सवयींचा अवलंब केल्यास हृदयाला दीर्घायुष्यासाठी बऱ्याच अंशी निरोगी ठेवता येतं. पुरुषांमधील हृदयविकाराची लक्षणे आणि हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवण्याचे काही उपाय येथे जाणून (Men Health Tips) घेऊया.
आजकालच्या जीनशैलीत हृदयविकार (Heart disease) खूप कॉमन झाले आहेत. पुरुषांबद्दल बोलायचे झाल्यास ३० ते ३५ वयोगटातील पुरुषांमध्येही हृदयविकाराचा झटका येणं, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा ऐकायला मिळतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी, अति धूम्रपान, खराब जीवनशैली, वय, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी हृदयविकाराचे मुख्य जोखीम घटक आहेत. मात्र, हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे ओळखून काही चांगल्या सवयींचा अवलंब केल्यास हृदयाला दीर्घायुष्यासाठी बऱ्याच अंशी निरोगी ठेवता येतं. पुरुषांमधील हृदयविकाराची लक्षणे आणि हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवण्याचे काही उपाय येथे जाणून (Men Health Tips) घेऊया.
पुरुषांमध्ये हृदयरोगाची लक्षणे
SingleCare.com मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, हृदयविकारामध्ये अस्वस्थ वाटणं, हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल होणं यासारख्या अनेक भिन्न परिस्थितींचा समावेश होतो. या सर्वांची लक्षणे बहुतेक सारखीच असतात. पुरुषांमधील हृदयविकाराच्या महत्त्वाच्या लक्षणांविषयी जाणून घेऊया.
असं होतंय का बघा -
- शारीरिक काम करताना छातीत दुखतं आणि विश्रांती घेतल्यावर कमी होतं.
- वारंवार धाप लागते.
- जबडा दुखतो, डाव्या हातात वेदना.
- थंड घाम येणं
- मळमळ अस्वस्थ वाटतं किंवा उलट्या.
- छातीत जडपणा, दाब जाणवतो.
- दोन्ही घोट्याला सूज येऊ शकते.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी टिप्स
- किमान ३० मिनिटे व्यायाम करा - दीर्घायुष्यासाठी हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर तुम्हाला दररोज व्यायाम करण्याची सवय लावावी लागेल. निरोगी हृदयासाठी प्रौढांना दररोज १५० मिनिटे मध्यम व्यायामाची आवश्यकता असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हृदयासाठी व्यायामाचा सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे एरोबिक व्यायाम, ज्यामध्ये चालणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे यांचा समावेश होतो. दिवसातून ३० मिनिटे व्यायाम केल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते.
- सकस आहार आवश्यक- हृदय निरोगी ठेवणारे पदार्थ खा. हृदय-निरोगी राखणाऱ्या पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट-समृद्ध बेरी, पालक आणि एवोकॅडो, ओमेगा-3 फॅटी अॅसिडसाठी मासे इत्यादींचा समावेश होतो. या गोष्टी पुरुषांनी खायला हव्या. हे पदार्थ निरोगी हृदयासाठी खूप महत्त्वाचे आहेत, तसेच पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शन कमी करतात. इतकेच नाही तर प्लांट बेस्ड और मेडिटेरेनियन स्टाइल डाइट देखील खराब रक्त परिसंचरण सुधारतो. खराब रक्ताभिसरणामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. उच्च फायबरयुक्त आहार घेतल्यास हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याचा धोका कमी होतो.
- निरोगी पूरक आहार घ्या- ओमेगा-3 फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम, फोलेट, व्हिटॅमिन डी इत्यादींचा आहारात समावेश करा. हे सर्व हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. हृदयासाठी या पूरक गोष्टी किती फायदेशीर आहेत, यावर संशोधन आणि क्लिनिकल चाचण्या होणं बाकी आहे.
- दररोज पुरेशी झोप घ्या- शरीराचा थकवा घालवणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही झोपेत असताना शरीर आपोआप रिकव्हर होत असतं. निरोगी हृदय आणि एकूण आरोग्यासाठी किमान 6 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे.
- तणाव घेऊ नका - ताणतणाव अनेक आजारांना जन्म देतो. यामध्ये हृदयविकाराचाही समावेश आहे. तुम्ही तणाव आणि चिंतेमध्ये राहत असाल तर या समस्या लवकरात लवकर घालवा, नाहीतर तुम्हाला हृदयविकाराचा त्रास कमी वयात होऊ शकतो. सततच्या तणावामुळे शरीरात अॅड्रेनालाईन आणि कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडतात, जे कालांतराने शरीराला जास्त नुकसान पोहोचवतात. तणाव कमी करण्यासाठी दररोज ध्यान, योगासने आणि अशा काही क्रिया करा ज्यामुळे तणाव दूर होतो आणि तुमचा मूड फ्रेश होतो.