Diet Plan : चहाबरोबर खारी, रक्तातील साखर होईल भारी; सकाळी मैदा खाणे हानीकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 09:31 AM2022-10-13T09:31:50+5:302022-10-13T10:57:00+5:30
बऱ्याच मुलांना बिस्किटचा संपूर्ण पुडाच लागतो. काही मुले टोस्टवर धडाका लावतात....
पुणे : सकाळी सगळे आवरून झाल्यावर पहिल्या चहाबरोबर खारी, टोस्ट लागतातच. काही नाही तर किमान बिस्किट तरी हवेच. हे सगळे खाण्यासाठी फारच छान लागते; पण ते रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरते. ज्यांना त्रास आहे तो वाढू शकतो तर ज्यांना नाही त्यांना तो सुरू होऊ शकतो.
सगळीकडेच चहा- खारी, बिस्किटे
सर्वसामान्यांपासून ते धनिकांपर्यंत बहुतेकांच्या घरी सकाळच्या चहाची सुरुवात ही त्याच्याबरोबर काहीतरी खायला घेऊनच केली जाते. त्यातही टोस्ट, खारी, बिस्किट हे पदार्थ तर असतातच. लहान मुले तर सकाळी शाळेत जाताना खाण्याची सुरुवातच यापासून करतात. पालकच त्यासाठी आग्रही असतात. बऱ्याच मुलांना बिस्किटचा संपूर्ण पुडाच लागतो. काही मुले टोस्टवर धडाका लावतात तर वसाहतीमधील मुलांंना खारी खाल्याशिवाय होतच नाही.
का नकोत हे पदार्थ?
हे सर्व पदार्थ मैद्यापासून तयार होतात. त्यात पोषणमुल्य तर नाहीतच पण शरीरात आधीपासून असलेल्या योग्य प्रथिनांचीही ते हानी करतात. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण ते वाढवतात. असेच खाण्याची सवय ठेवली तर शरीरालाही त्याचीच सवय होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. ती वाढली की आपोआपच रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. हे चक्रच आहे. खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर या सगळ्याची परिणिती अखेर दवाखान्यात दाखल होण्यातच होते.
मग खावे तरी काय?
आहारतज्ज्ञांच्या मते सकाळी सर्वप्रथम आपण जे काही खातो ते शरीराला उपयुक्त घटक ज्यात असतील तेच असायला हवे. कारण, यावेळी खालेल्या पदार्थांचे चांगले पचन होते. मैद्याचे पदार्थ खाल्ले तर त्याचे पचन होईल. मात्र, त्यापासून शरीराला आवश्यक ते घटक मिळणारच नाहीत. त्याचबरोबर नंतरचा शरीराला आवश्यक असणारा नाश्ता करता येणार नाही. कारण, पोट भरलेले असते. त्यामुळे शक्यतो गव्हाच्या पिठापासून तयार केलेला खाकरा किंवा त्यासारखे पदार्थ यावेळी खायला हवेत.
मैद्याच्या पदार्थांमुळे शुगर वाढते, ती अनियंत्रीत होते व वाढलेल्या शुगरमुळे रक्तदाबाचाही त्रास होतो. लहान मुलांसाठी तर हे सर्वात धोकादायक खाणे आहे. कारण, मुलांना त्याची सवय होते व नंतर मग दुसरे पौष्टिक खाणे त्यांच्याकडून होतच नाही. त्यामुळे खारी, टोस्ट असे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत.
- सुप्रिती दीक्षित, आहारतज्ज्ञ