आज बाल कर्करोग निवारण दिन; ‘टाटा’त दरवर्षी २,८०० बाल कर्करोगग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 09:54 AM2022-02-15T09:54:24+5:302022-02-15T09:54:34+5:30
प्रौढांपेक्षा बालकांवर कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात
स्नेहा मोरे
मुंबई : मागील काही वर्षांपासून टाटा रुग्णालयात बाल कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. लोकसंख्येची वाढती घनता हे याचे मुख्य कारण असल्याचे टाटा रुग्णालयातील बाल कर्करोग तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. टाटा रुग्णालयात दरवर्षी १५ वर्षांखालील २,८०० नवीन रुग्ण दाखल होतात, तर अठरा वर्षांखालील नवीन बाल कर्करोग रुग्णांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
प्रौढांपेक्षा बालकांवर कर्करोगामध्ये त्याच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यांत भिन्नता असते. तसेच प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात, मात्र केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेळीच निदान झाल्यास लहान मुलांमधील कर्करोग बरा होऊ शकतो.
कर्करोग शरीराच्या ज्या स्थानी निर्माण होतो त्यानुसार लक्षणे निर्माण होतात. त्यासाठी शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपी या चिकित्सा पद्धतींच्या साहाय्याने या कर्करोगाची चिकित्सा केली जाते. मुलांमधील कर्करोगावर उपचार करताना रुग्णालयामध्ये आता इम्युनथेरपीचा वापर प्रभावीरीत्या केला जात आहे. यामध्ये मुलांमध्ये कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. पहिल्या पाच वर्षांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवला नाही तर मूल कॅन्सरमुक्त झाल्याचे वैद्यकीय निदान करण्यात येते, असे टाटा मेमोरिअलचे बाल कर्करोग विभागाचे तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले.
ल्युकेमियाचे ५० टक्के रुग्ण
मुलांमध्ये ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी येणे, लाल डाग येणे, पोट फुगणे इत्यादी. अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो. याव्यतिरिक्त मेंदूचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असा इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो.