जास्त मीठ खाल्ल्याने होते 'ही' गंभीर समस्या, तुम्ही कधी याबाबत विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:35 PM2022-11-21T12:35:37+5:302022-11-21T12:37:34+5:30
मिठाशिवाय पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते.
कोणत्याही पदार्थात मीठ असणे आवश्यक आहे. मिठाशिवाय त्या पदार्थाला चवच नाही. मात्र अनेकांना वरुन मीठ घेण्याची सवय असते जी अत्यंत चुकीची सवय आहे. याचा अर्थ तुम्हाला अतिप्रमाणात मीठ खावे वाटते. अन्नात कधी मीठ कमी जरी पडले तरी शक्यतो ते तसेच खावे. पदार्थ तयार झाल्यावर तो ताटात वाढल्यावर वरुन मीठ घेऊ नये. यामुळे हृदय, मुत्रपिंडाचे विकार होतात हे आपण ऐकलंच असेल. पण याचा मानसिक परिणामही होतो. एका संशोधनातुन हे सिद्ध झाले आहे.
संशोधनात काय म्हणले आहे ?
एडिनबर्गच्या युनिव्हर्सिटी ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्स सेंटरमधील रेनल फिजिओलॉजीचे प्राध्यापक मॅथ्यू बेली यांनी केलेल्या रिसर्चनुसार अन्नातील मिठामुळे मानसिक आरोग्य बदलते. जास्त मीठ खाल्ल्याने मेंदुचा ताण वाढतो. यामुळे हार्मोन्समध्येही मोठे बदल होतात. यामुळे तणाव येऊ शकतो. तो तणाव कसा हाताळायचा हे व्यक्तीव्यक्तीवर अवलंबुन आहे. म्हणुनच काही जणांना खूप खारट सहन होत नाही. उच्च रक्तदाबाचा त्रासही होतो.
कार्डिओव्हॅस्क्युलर संशोधकांनी उंदरांवर प्रयोग करुन बघितला. जास्त मीठ सेवन केल्याने स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते. कमी मीठ सेवन केलेल्या उंदरांपेक्षा जास्त मीठ खाल्लेल्या उंदरांमध्ये स्ट्रेस हार्मोन पातळी ७५ टक्क्यांनी वाढली.
मानसिक आणि शारीरीक त्रास
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तवाहिन्या, हृदय, आणि मुत्रपिंडावर परिणाम होतो. याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच स्ट्रेस हार्मोनच्या पातळीत वाढ झाली तर आपल्या वागण्यात फरक जाणवतो. नेमके व्यक्तीच्या स्वभावात काय फरक पडतो याचा अभ्यास अजुन सुरु आहे. ज्यांना बीपी, डायबिटिस आहे त्यांना कमी मीठ खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. मीठ सोडियम क्लोराईडने बनले आहे ज्याचे अतिसेवन शरीरावर घातक परिणाम करतात.