...तर लग्नात बारीकही दिसाल आणि खुलूनही; टॉप १० टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 02:31 PM2020-03-02T14:31:30+5:302020-03-02T14:39:12+5:30
लग्नापूर्वीचे दिवस हे काही 'वेट लॉस'चे म्हणजे फॅड डाएट्स, क्विक फिक्स किंवा लिक्विड डाएट्ससाठीचे योग्य दिवस नाहीत.
>> आहारतज्ज्ञ डॉ. स्नेहल अडसुळे
'लग्नात सुंदर, आकर्षक दिसणं' हे प्रत्येक वधूचं स्वप्न, नव्हे ध्येय असतं आणि ह्या ध्येयपूर्तीसाठी ती काहीही करायला तयार असते. मैत्रिणींपैकी कुणीतरी सांगतं, “बारीक हो, बारीक झालीस की छान दिसशील!” पण एक गोष्ट लक्षात ठेवा- लग्नापूर्वीचे दिवस हे काही 'वेट लॉस'चे म्हणजे फॅड डाएट्स, क्विक फिक्स किंवा लिक्विड डाएट्ससाठीचे योग्य दिवस नाहीत. बारीक होण्याच्या नादात असल्या डाएटमुळे तुम्ही कदाचित वजन कमीही कराल, पण तुमची त्वचा फिकट किंवा निस्तेज दिसेल. लग्नासाठी तुम्ही भरमसाठ पैसे मोजून नेमलेला फोटोग्राफर लग्नाच्या फोटोंचा आल्बम तुम्हाला जेव्हा देईल, तेव्हा तुम्हाला हा साक्षात्कार होईल आणि तोपर्यंत तर खूपच उशीर झालेला असेल. नाही का?
खरंतर, लग्नाच्या दिवशी सुंदर, आकर्षक, ताजंतवानं दिसण्यासाठी सम्यक आहाराची गरज असते. ताजी फळं, ताज्या भाज्या, सुके मांस किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ, लो-फॅट दुग्ध उत्पादनं, संपूर्ण धान्य आणि मर्यादित प्रमाणात हेल्दी फॅटचा तुमच्या आहारात समावेश असायला हवा. त्यातही विशेष करून फळं आणि भाज्याचं तुमच्या आहारातील प्रमाण वाढवल्यास निरोगी त्वचा- केस- शरीरासाठी आवश्यक ती जीवनसत्वं मिळतील.
काही बेसिक गोष्टी ज्या लक्षात ठेवायलाच हव्यात-
>> प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा (सर्व प्रकारचं पॅकेज् फूड).
>> कृत्रिम गोड पेये टाळा (सॉफ्ट ड्रिंक्स, कोला, मॉकटेल वगैरे).
>> भरपूर पाणी प्या (दिवसाला तीन-चार लिटर).
>> तळलेले आणि अतिमसालेदार पदार्थ खाणं सोडा.
>> मद्यसेवन कमी करा किंवा थांबवा.
>> जंक फूडचं सेवन टाळा.
>> रात्रीचं जेवण लवकर करा (शक्यतो आठपूर्वी).
>> दररोज पुरेशी झोप घ्या (सात ते आठ तास).
>> ग्रीन टी आणि नारळ पाण्याचा तुमच्या आहारात समावेश करा.
>> बाहेर जेवायची वेळ आलीच तर पदार्थ मागवताना अधिक आरोग्यदायी पर्यायांचा विचार करा.
व्यायाम केला तर सोने पे सुहागा!
ह्या आहाराला जर तुम्ही फिजिकल अॅक्टिव्हिटीची म्हणजे व्यायामाची जोड दिली, तर तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट निश्चितच मिळतील. तुम्हाला व्यायाम आवडत नसेल तरी कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल अॅक्टिव्हिटी आवर्जून करा. भराभर चालणे, थोडं अंतर धावणे किंवा अगदी घरातल्या घरात थोडंसं वर्कआऊट तरी करावं.
आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे, आनंदी राहा. तणाव किंवा थकवा तुमच्या चेह-यावर जाणवतो, हे लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा क्षण हा सर्वात सुंदर क्षण व्हावा, ह्यासाठी इतकी काळजी तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. नाही का?
(लेखिका न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशिअन असून 'वूमन मेटाबोलिझम डाएट' ह्यात विशेषज्ञ आहेत.)