दिवाळीत बनावट मावा खाऊन पडू नका आजारी, 'असा' ओळखा भेसळयुक्त मावा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:46 PM2021-10-27T17:46:59+5:302021-10-27T17:56:30+5:30
मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर तो दिवाळीची मजा तर खराब करू शकतोच शिवाय तो तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
सणासुदीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांनी दिवाळी, भाऊबीज येणार आहेत. अशा वेळी प्रत्येक सणाची मजा द्विगुणित करण्यासाठी आणि नात्यात गोडवा आणण्यासाठी लोक अनेक प्रकारची मिठाई घरी बनवतात किंवा विकत आणतात. बहुतेक मिठाई माव्यापासून बनवली जाते. जी खायला खूप चविष्ट असते. मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मावा जर बनावट असेल तर तो दिवाळीची मजा तर खराब करू शकतोच शिवाय तो तुमच्या आरोग्यासाठीही घातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत मावा खरेदी करणार असाल तर मावा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा.
मावा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा-
- मावा ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खरा मावा मऊ आणि बनावट मावा खडबडीत असतो. खवा मऊ नसेल तर अशुद्ध आहे हे समजून घ्या.
- मावा घेण्यापूर्वी थोडा खाऊन बघावा. मावा खरा असेल तर तोंडाला चिकटणार नाही पण मावा चिकटला तर समजून घ्या की मावा भेसळयुक्त आहे.
- मावा खरेदी करण्यापूर्वी हातात मावा घेऊन त्याची गोळी तळहातावर ठेवावी. असे केल्यावर जर तो फुटायला लागला तर समजून घ्या की मावा बनावट आहे.
- अंगठ्याच्या नखावर मावा चोळा. खरा असेल तर तुपाचा वास येईल.
- मावा विकत घ्यायला गेलात तर तोंडात ठेवून तपासून पहा. मावा खाल्ल्यानंतर जर कच्च्या दुधाची चव जाणवत असेल तर मावा खरा आहे .