सावधान! तुम्ही वापरत असलेल्या टुथपेस्ट, साबणातील 'ट्रायक्लोझन' ठरू शकतं घातक – IIT हैदराबाद
By manali.bagul | Published: December 16, 2020 03:48 PM2020-12-16T15:48:45+5:302020-12-16T16:00:40+5:30
Health Tips in Marathi : हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना ट्रायक्लोझन हा हानीकारक पदार्थ टूथपेस्ट, साबण आणि डिओडोरंट्ससारख्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांमध्ये सापडला आहे.
दैनंदिन जीवन जगत असताना टुथपेस्ट, साबण, हँण्डवॉश यांसारख्या वैयक्तीक वापराच्या गोष्टींशी आपला संबंध येत असतो. अनेकदा वैयक्तीक वापराच्या वस्तूंमुळे असलेल्या हानीकारक पदार्थांमुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अशीच धक्कादायक बाब समोर आली आहे. हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना ट्रायक्लोझन हा हानीकारक पदार्थ टूथपेस्ट, साबण आणि डिओडोरंट्ससारख्या दैनंदिन वापराच्या उत्पादनांमध्ये सापडला आहे.
या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच युनायटेड किंगडममधून प्रकाशित झालेल्या ‘केमोसफेयर’ या अग्रगण्य जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले. बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अनामिका भार्गव यांच्या अध्यक्षतेखालील करण्यात आलेल्या या अभ्यासात संशोधकांना असे आढळले की मर्यादेपेक्षा ५०० पट कमी ट्रायक्लोझन असल्यास मानवी मज्जासंस्थेस हानी पोहोचू शकते.
ट्रायक्लोझन एक बॅक्टेरियाविरोधी आणि अँटी-मायक्रोबियल एजंट आहे. याचा परिणाम मानवी शरीरातील मज्जासंस्थेवर होतो. स्वयंपाकघरातील उत्पादनं आणि कपड्यांमध्येही हे केमिकल आढळते. सुरूवातीला १९६० च्या दशकात या केमिकलचा उपयोग वैद्यकीय सेवा उत्पादनांपुरता मर्यादित होता.
हिवाळ्यात होणारा अंगदुखीचा त्रास असू शकतं कोरोनाचं लक्षणं? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
अलिकडेच अमेरिकेतील आरोग्य संस्था FDA ने ट्रायक्लोझनविरूद्धच्या पुराव्यांचा आढावा घेतला आणि त्याच्या वापरावर अंशतः बंदी घातली. परंतु भारतात अद्याप ट्रायक्लोझन-आधारित उत्पादनांच्या वापरावर कोणंतीही बंधनं घालण्यात आलेली नाही. आयआयटीच्या संशोधकांनी सांगितले की, ''ट्रायक्लोझन फारच थोड्या प्रमाणात असेल तर चालू शकते, परंतु दररोज वापरल्या जात असलेल्या वस्तूंमधील केमिक्लसच्या जास्त वापरामुळे ते खूप धोकादायक ठरू शकते. हे संशोधन झेब्राफिशवर करण्यात आले होते. ज्यात रोग प्रतिकारशक्ती मानवी प्रतिकारशक्ती प्रमाणेच आहे.
कोरोनानंतर 'या' देशात नव्या माहामारीचा कहर; १० राज्यातील लोक आजाराच्या विळख्यात
डॉ. अनामिका भार्गव यांनी सांगितले की,'' या अभ्यासामध्ये असे दिसून आले की ट्रायक्लोझन केवळ काही मिनिटात न्युरोट्रांसमिशनमध्ये समाविष्ट असलेल्या जीन्स आणि एंजाइमांवर परिणाम करू शकते यामुळे न्यूरॉन्सचे नुकसान देखील होऊ शकते. याचा एखाद्या अवयवाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.''