मुंबईकरांभोवती क्षयरोगाचा घट्ट विळखा, पूर्ण उपचारांकडे फिरविली पाठ, निराशाजनक चित्र

By स्नेहा मोरे | Published: March 24, 2023 01:17 PM2023-03-24T13:17:03+5:302023-03-24T13:17:11+5:30

शहर उपनगरांत मागील तीन वर्षांत निदान होणाऱ्या एकूण क्षय रुग्णांपैकी केवळ २० टक्के रुग्णच उपचार पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे.

Tuberculosis is tight around Mumbaikars, turning their backs on complete treatment, a depressing picture | मुंबईकरांभोवती क्षयरोगाचा घट्ट विळखा, पूर्ण उपचारांकडे फिरविली पाठ, निराशाजनक चित्र

मुंबईकरांभोवती क्षयरोगाचा घट्ट विळखा, पूर्ण उपचारांकडे फिरविली पाठ, निराशाजनक चित्र

googlenewsNext

मुंबई :  एकीकडे केंद्र सरकारने २०२५ मध्ये क्षय निर्मूलनाचे उद्दिष्ट जाहीर केले असले तरी दुसरीकडे क्षयाचे धक्कादायक वास्तव वेगळे आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांमध्ये क्षयरोगाचा धोका वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, दुसरीकडे क्षयरोगाचे उपचार पूर्ण करण्याकडे मात्र रुग्णांनी पाठ केल्याचे निराशाजनक चित्र आहे. याखेरीज, मुंबईतील एकूण क्षय रुग्णांमध्ये औषधास दाद न देणाऱ्या डीआरटीबी क्षयाचे प्रमाण वाढत आहे. 

शहर उपनगरांत मागील तीन वर्षांत निदान होणाऱ्या एकूण क्षय रुग्णांपैकी केवळ २० टक्के रुग्णच उपचार पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, महिला, पुरुषांमध्ये २०२० ते २०२२ या काळात क्षयाची तीव्रता वाढत आहे.   क्षयरोग हा जगातील सर्वांत प्राणघातक संसर्गजन्य रोगांपैकी एक आहे. जगात दररोज या रोगाचे २८ हजार रुग्ण आढळून येतात.

अर्धवट उपचार अधिक जीवघेणे
 गेल्या तीन वर्षांंत निदान झालेल्या क्षय रुग्णांपैकी अत्यल्प रुग्णांनी उपचार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मात्र, क्षयाचे उपचार अर्धवट सोडणे अधिक जीवघेणे ठरत असल्याचेही डॉक्टरांनी अधोरेखित केले आहे. 
 थोडे बरे वाटल्यानंतर रुग्णांनी औषध घेणे थांबविणे किंवा औषधांचा प्रभाव कमी झाल्याने एमडीआर-क्षय होण्याची शक्यता असते, त्यामुळे पालिकेकडूनही सातत्याने या रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांना उपचारांच्या प्रवाहात ठेवणे, पोषण आहाराची काळजी घेणे, अशा विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

डीआरटीबी ठरतोय अधिक घातक
मुंबईत औषधांना प्रतिरोधी क्षयरोगाची (डीआर टीबी) बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. औषध प्रतिरोधी क्षयाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये क्षयरोगाची नियमित औषधेही काम करत नाहीत. त्यामुळे अतितीव्र प्रतिजैविकांचा वापर यांच्या उपचारांमध्ये केला जातो. मुंबईत २०२० मध्ये डीआरटीबी रुग्णांची संख्या ४ हजार ७७५ होती, आता हे प्रमाण ५ हजार ६२५ वर गेले आहे.

११ हजारांहून अधिक लहानग्यांना क्षय
लहान मुलांमध्ये टीबीचे प्रमाण वाढत असल्याचे पालिकेच्या माहितीतून दिसून येते. नवजात बालक ते सात वर्षांतील वयोगटातील मुलांमध्ये हे टीबीची लागण होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. २०२० ते २०२२ या कालवधीत ११ हजार ७२७ लहान मुलांना टीबीची लागण झाली आहे. औषधोपचार पद्धतीत सुधारणा झाल्याने आता हा आजार बरे होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Tuberculosis is tight around Mumbaikars, turning their backs on complete treatment, a depressing picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य