'या' प्रकारच्या डायबिटीसमुळे मेंदुचे आजार होण्याची शक्यता, अल्झायमरचाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:03 PM2022-08-10T17:03:36+5:302022-08-10T17:06:50+5:30
प्रकाराला या रोगाचा सर्वात घातक प्रकार देखील म्हणता येईल. त्यामुळे रुग्णाला रक्ताच्याच नव्हे तर मेंदूच्या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. त्याविषयी सविस्तर जाणून (What is Type 3 Diabetes) घेऊया.
मधुमेहामुळे हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका वाढतो. टाइप 1 मधुमेहामध्ये, रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन फार कमी किंवा कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. टाईप 2 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता निर्माण होते आणि इन्सुलिनचे उत्पादन असूनही आपले शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही. मधुमेहाचे हे दोन प्रमुख प्रकार आहेत. मात्र, कधी-कधी 'टाइप 3 मधुमेह' असाही अलिकडे उल्लेख केला जातो. या प्रकाराला या रोगाचा सर्वात घातक प्रकार देखील म्हणता येईल. त्यामुळे रुग्णाला रक्ताच्याच नव्हे तर मेंदूच्या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. त्याविषयी सविस्तर जाणून (What is Type 3 Diabetes) घेऊया.
टाइप 3 मधुमेह म्हणजे काय?
मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, काही लोक अल्झायमर रोगासाठी 'टाइप 3 मधुमेह' हा शब्द वापरतात. मात्र, अधिकृत आरोग्य संस्था ही संज्ञा स्वीकारत नाहीत. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की इंसुलिनच्या प्रतिकारामुळे मेंदूमध्ये अमायलोइड प्लेक्स, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो. डॉक्टरांनीही हा आजार टाइप 3 मधुमेह म्हणून स्वीकारलेला नाही. त्यांच्या मते हा आजार अल्झायमरच्या श्रेणीत ठेवायला हवा. सहसा, या रोगाचा रुग्णाच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होतो. यामुळे त्याला मेंदूशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. या आजाराची लक्षणे अगदी सामान्य दिसतात, परंतु वेळीच उपचार न केल्यास ते खूप घातक देखील ठरू शकते.
टाइप 3 मधुमेहाची लक्षणे जाणून घ्या -
- स्मरणशक्ती कमी होणे, ज्यामुळे कामकाजावर परिणाम होतो.
- नवीन योजना बनवणे आणि लिहिण्यात अडचण
- घरगुती सर्वसाधारण कामे पूर्ण करण्यातही अडचणी.
- एखाद्याला भेटण्याची जागा वारंवार विसरणे.
- एकाद्या विषयावर आपलं मत व्यक्त करता येत नाही.
- सामाजिक आणि आर्थिक कामात रस कमी होणे.
- मूडमध्ये अचानक बदल
टाइप 3 मधुमेह कसा टाळावा -
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या माहितीनुसार, दैनंदिन शारीरिक क्रियाकलाप, रक्तदाब निरीक्षण, कॉग्निटिव ट्रेनिंग याद्वारे हा प्रकार नियंत्रिक केला जाऊ शकतो. टाईप 3 मधुमेहाच्या प्रतिबंधात अन्न आणि पेय यांच्यात कोणताही संबंध नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसने शिफारस केली आहे की, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे आणि शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि प्री-डायबेटिस टाळता येऊ शकते. अल्झायमर रोग टाळण्यासाठी कोणत्याही धोरणाची प्रभावीता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेली नाही. मात्र, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फायदेशीर ठरू शकते.