डोकेदुखीचे आहेत इतके प्रकार की वाचूनच डोकं दुखायला लागेल! जाणून घ्या कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 09:15 PM2022-08-03T21:15:00+5:302022-08-03T21:36:59+5:30

सातत्यानं डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला आणि उपचारांची गरज भासू शकते.

types of headache | डोकेदुखीचे आहेत इतके प्रकार की वाचूनच डोकं दुखायला लागेल! जाणून घ्या कोणते?

डोकेदुखीचे आहेत इतके प्रकार की वाचूनच डोकं दुखायला लागेल! जाणून घ्या कोणते?

googlenewsNext

प्रत्येक माणसाला कधी ना कधी डोकेदुखीचा (Headache) त्रास जाणवतोच. डोकं आणि चेहऱ्याच्या भागात वेदना होणं हे डोकेदुखीचं मुख्य लक्षण असतं. काही वेळा डोकेदुखी तीव्र स्वरूपाची असते. काही वेळा डोकेदुखीचा त्रास सौम्य स्वरूपाचा असतो. डोकेदुखीचा त्रास होण्यामागे अनेक कारणं असतात. त्यात प्रामुख्याने, सायनस, पित्तविकार, मान आणि खांद्याचे विकार, ताण-तणाव, अन्य आजारांवरी औषधं, रक्तदाब, संसर्ग आदींचा समावेश असतो. सातत्यानं डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल, तर वैद्यकीय सल्ला आणि उपचारांची गरज भासू शकते.

वैद्यकशास्त्रात डोकेदुखीचे सुमारे 150 प्रकार सांगितले गेले आहेत. परंतु, त्यापैकी मोजकेच प्रकार रुग्णांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. या प्रकारांमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे उपप्रकार आहेत. प्रायमरी प्रकारांत क्लस्टर हेडेक, अर्धशिशी, दररोज जाणवणारी डोकेदुखी, तणावामुळे होणारा डोकेदुखीचा त्रास आदींचा समावेश होतो. सेकंडरी प्रकारातल्या डोकेदुखीमागे मेंदूतल्या रक्तवाहिन्यांचे आजार, मेंदूला इजा, उच्च रक्तदाब, संसर्ग, औषधांचा दुष्परिणाम, सायनस कंजेशन, ट्रॉमा, ट्युमर ही कारणं असू शकतात. मेंदू, रक्तवाहिन्या आणि आजबाजूच्या नसांमधल्या परस्पर क्रियेमुळे डोकेदुखीच्या वेदना जाणवतात. डोकेदुखीदरम्यान एक अज्ञात यंत्रणा स्नायू आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या विशिष्ट नसा सक्रिय करते. या नसा मेंदूला वेदनांचे संकेत पाठवतात.

अर्धशिशी आणि डोकेदुखीचा त्रास होण्यासाठी काही गोष्टी ट्रिगर ठरतात. मद्यपान, आहार आणि झोपेच्या पॅटर्नमध्ये बदल, डिप्रेशन, इमोशनल स्ट्रेस, डोळे, मान आणि पाठीवर ताण येणं, तीव्र प्रकाश, गोंधळ आणि हवामानबदलामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोकेदुखीचे प्रमुख प्रकार कोणते आणि त्यामागच्या कारणांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊ या.

प्रायमरी अर्थात प्राथमिक स्वरूपाची डोकेदुखी ही कोणत्याही शारीरिक दोषाचं किंवा रोगाचं लक्षण नसते. अशी डोकेदुखी काही काळ जाणवते आणि नंतर त्रास थांबतो. सर्वसामान्यपणे ही डोकेदुखी धोकादायक मानली जात नाही.

एखाद्या ट्रिगरमुळे मान आणि डोक्यामधल्या भागात वेदना जाणवू लागतात. त्यास सेकंडरी किंवा दुय्यम स्वरूपाची डोकेदुखी म्हणतात. हा त्रास तसा दुर्मीळ स्वरूपाचा असला तरी प्राथमिक डोकेदुखीच्या तुलनेत गंभीर असतो. तसंच ही डोकेदुखी काही गंभीर आजारांचीही सूचक असते.

ताणामुळे जाणवणारी डोकेदुखी (Tension Headache) – आबालवृद्धांमध्ये डोकेदुखीचा हा त्रास सर्वसामान्यपणे आढळून येतो. यात कोणतीही अन्य लक्षणं दिसत नाहीत. काही काळानंतर हा त्रास बरा होतो.

अर्धशिशी (Migraine) – अर्धशिशीत रुग्णाला तीव्र वेदना जाणवतात. या वेदना 4 तास ते 3 दिवसांपर्यंत राहतात. महिन्यातून एक ते चार वेळा असा त्रास होऊ शकतो. यात रुग्णाला प्रकाश, आवाज आणि तीव्र वास नकोसा वाटतो. मळमळ, उलट्या, भूक न लागणं आणि पोटदुखी ही यातली अन्य लक्षणं असतात.

क्लस्टर हेडेक (Cluster Headache) – डोकेदुखीचा हा प्रकार काहीसा गंभीर मानला जातो. डोळ्याच्या मागे, आजूबाजूला तीव्र वेदना जाणवतात. या डोकेदुखीमुळे रुग्ण अस्वस्थ होऊ शकतो. तसंच या डोकेदुखीदरम्यान डोळे लाल होणं, बाहुली लहान होणं, डोळ्यांतून पाणी येणं, नाक चोंदल्यासारखं वाटणं हे त्रासही जाणवतात. असा त्रास रुग्णाला दिवसातून एक ते तीन वेळा जाणवतो आणि तो 2 आठवडे ते 3 महिन्यांपर्यंत जाणवू शकतो.

दररोज जाणवणारी डोकेदुखी (New Daily Persistent Headache) – डोकेदुखीचा हा त्रास अचानक जाणवू लागतो आणि तो 3 महिन्यांपर्यंत राहतो. ही डोकेदुखी सातत्यानं जाणवते. तसंच ही औषधाला फारसा प्रतिसाद देत नाही.

सायनसमुळे होणारी डोकेदुखी (Sinus Headache) – सायनसला संसर्ग झाल्यास किंवा अ‍ॅलर्जीमुळे सायनुसायटिसचा त्रास उद्भवल्यास ही डोकेदुखी जाणवते. यात डोकेदुखीसह, तोंडाची चव जाणं, चेहऱ्याला सूज येणं, ताप, डोक्याची हालचाल केल्यावर तीव्र वेदना जाणवणं, हाडं आणि कपाळात सतत वेदना होणं ही लक्षणं दिसतात.

औषधांच्या अतिवापरामुळे होणारी डोकेदुखी (Medication Overuse Headache) : जेव्हा एखादी व्यक्ती डोकेदुखी थांबण्यासाठी वारंवार वेदनाशामक औषधं घेते तेव्हा अशा औषधांमुळे डोकेदुखीचा त्रास अधिक जाणवू लागतो. हा प्रकार 5 टक्के रुग्णांमध्ये आढळतो.

हॉर्मोन हेडेक (Hormone Headache) : डोकेदुखीचा हा प्रकार महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉजच्या काळात हॉर्मोन्समध्ये बदल होतात. तसंच हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही हॉर्मोन्सची पातळी बदलते. या गोष्टी डोकेदुखीसाठी ट्रिगर ठरतात. परंतु, उपचारांमुळे ही डोकेदुखी लवकर बरी होते.

Cholesterol चांगलं की वाईट कसं ठरतं? बॅड कोलेस्टेरॉल वाढलं तर काय करायचं?

थंडर क्लॅप हेडेक (Thunderclap Headache) – डोकेदुखीच्या दुय्यम अर्थात सेकंडरी प्रकारात थंडरक्लॅप हेडेकचा समावेश होतो. मेंदूतल्या रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास, मेंदूला इजा झाल्यास, हॅमरेज किंवा इस्चेमिक स्ट्रोकमुळे, मेंदूतल्या रक्तवाहिन्यांच्या दाहामुळे ही डोकेदुखी जाणवते. यासाठी वैद्यकीय उपचार घेणं आवश्यक असतं.

सर्वसामान्यपणे एखादा आजार, ताण-तणाव, वातावरण, जेनेटिक्स या गोष्टी डोकेदुखीसाठी कारणीभूत असतात. तसंच काही ट्रिगर्सही डोकेदुखीचं कारण ठरतात. त्यामुळे डोकेदुखीमागचं नेमकं कारण शोधून त्यावर वैद्यकीय उपचार घेणं, ताण-तणाव व्यवस्थापन करणं, आहारात बदल करणं आवश्यक आहे. त्यासोबतच डोकेदुखीचा त्रास वाटल्यास डोक्यावर गरम अथवा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून शेकणं, विश्रांती घेणं, हलका व्यायाम करणं, डोक्याला, मानेला आणि पाठीला हलका मसाज करणं फायदेशीर ठरू शकतं.

Web Title: types of headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.