जबरदस्त! शास्त्रज्ञ तयार करताहेत 'ऑल इन वन' लस; 'सुपर व्हॅक्सिन' ठरवणार माणसाचं भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:55 PM2021-08-04T15:55:54+5:302021-08-04T15:57:13+5:30
कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभारी ठरू शकणाऱ्या लसीवर संशोधन सुरू
लंडन: आपल्याच माणसांपासून दूर राहावं लागेल, त्यांच्यापासून अंतर ठेवावं लागेल, स्वत:ला घरात कोंडून घ्यावं लागेल याची कल्पना दोन वर्षांपूर्वी कोणीही केली नव्हती. मात्र कोरोना संकटामुळे माणसाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. या कालावधीत अनेकांनी त्यांच्या कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील माणसं गमावली. आतो कोरोनावर लस उपलब्ध झाली आहे. मात्र कोरोनाचा विषाणू नव्या व्हेरिएंटच्या माध्यमातून समोर येत आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी संपूर्ण जगभरात वापरता येईल अशा सुपर वॅक्सिनवर काम सुरू केलं आहे.
कोरोनानं संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. यामुळे लाखो लोकांचे प्राण गेले. अशा संकटाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोएलेशन फॉर एपिडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशन्सनं (सीईपीआय) ५ वर्षांची योजना सुरू केली. यावर २.५ बिलियन पाऊंड्स खर्च करण्यात येत आहेत. कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरू शकणारी लस तयार करण्याचं काम सध्या शास्त्रज्ञांनी सुरू केलं आहे. यासाठी अमेरिकन कंपनी व्हीबीआय व्हॅक्सिन्ससोबत करार करण्यात आला आहे.
कोरोनाच्या संभाव्य व्हेरिएंट्सचा धोका लक्षात घेऊन ऑल इन वन लस तयार केली जाईल. कोरोनाच्या विविध व्हेरिएंट्समधील समान गोष्टींचा अभ्यास करून ऑल इन वन व्हॅक्सिनची निर्मिती करण्यात येईल. आतापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा व्हेरिएंट आढळून आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर देशात डेल्टा प्लसचेदेखील रुग्ण आढळून आले.