लग्न न झालेल्या स्त्रिया व पुरुषांना आहे या रोगाचा गंभीर धोका, वेळीच काळजी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 03:40 PM2022-07-10T15:40:16+5:302022-07-10T15:42:15+5:30
सिंगल असलेल्या व्यक्ती कॅन्सरमधून बऱ्या होण्याचं प्रमाण त्यापेक्षा कमी असून, जोडीदारांपासून वेगळ्या झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत हे प्रमाण त्याहूनही कमी आहे, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
लग्न झालेल्या व्यक्तींपेक्षा लग्न न झालेल्या व्यक्तींना अनेक आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये कॅन्सरसारख्या (Cancer) रोगांचाही समावेश आहे. लग्न झालेल्या व्यक्तींमध्ये कॅन्सर झाल्यास त्यातून बरं होण्याची शक्यता जास्त असते; मात्र सिंगल व्यक्तींमध्ये हे प्रमाण खूप कमी असतं. लग्न झालेल्या व्यक्ती कॅन्सरमधून बऱ्या होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. सिंगल असलेल्या व्यक्ती कॅन्सरमधून बऱ्या होण्याचं प्रमाण त्यापेक्षा कमी असून, जोडीदारांपासून वेगळ्या झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत हे प्रमाण त्याहूनही कमी आहे, असं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. या संदर्भातलं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.
SWNS च्या निवेदनानुसार, अनहुई मेडिकल युनिव्हर्सिटीचे करस्पाँडिंग आर्थर प्रोफेसर अमन जू यांनी सांगितलं, की 'विवाहित व्यक्ती आर्थिकदृष्ट्या खूप स्थिर असतात. तसंच त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळतो. याच कारणांमुळे ते अशा जीवघेण्या आजारातून लवकर बरे होतात.'
पोटाचा कॅन्सर (Stomach Cancer) हे जगातलं मृत्यूचं तिसरं सर्वांत प्रमुख कारण आहे. प्रोफेसर जू आणि संशोधकांनी यूएसमधल्या 3647 रुग्णांचा अभ्यास केला. या रुग्णांमध्ये कॅन्सर त्यांच्या शरीराच्या इतर भागात पसरला नव्हता. या सर्व रुग्णांवर 2010 ते 2015 या कालावधीत यशस्वी उपचार करण्यात आले होते. या रुग्णांपैकी विवाहित व्यक्ती जगण्याचं प्रमाण 72 टक्के होतं. या संशोधनात असं आढळून आलं, की पतीच्या तुलनेत पत्नी जगण्याची शक्यता जास्त आहे. ज्या पुरुषांची पत्नी मरण पावली होती, त्यांच्या जगण्याची शक्यता खूपच कमी, म्हणजे 51 टक्के आढळली. त्यामुळे अशा परिस्थितीत, कोण किती जगेल हे जाणून घेण्यासाठी रुग्ण विवाहित आहे की अविवाहित आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
पोटाचा कॅन्सर म्हणजे काय?
आपण जे अन्न खातो ते आपल्या पोटात जातं. पोट हे अन्न पचवण्याचं काम करतं. जेव्हा पोटाच्या आतल्या भागात कॅन्सरच्या पेशी तयार होतात तेव्हा त्याचा ट्यूमर बनतो. याला गॅस्ट्रिक कॅन्सर असंही म्हणतात. हा कॅन्सर अनेक वर्षं हळूहळू वाढतो. 60 ते 80 वयोगटातल्या व्यक्तींना या कॅन्सरचा सामना करावा लागू शकतो. पोटाचा कॅन्सर शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो.
पोटाचा कॅन्सर होण्याची कारणं कोणती?
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीजमुळे (GERD) पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. यामध्ये पोटातलं अॅसिड पुन्हा अन्ननलिकेत जमा होतं. याशिवाय लठ्ठपणा, जास्त मीठ आणि स्मोकी पदार्थांचं सेवन, फळं (Fruits) आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश न करणं, पोटाच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास, पोटात जळजळ होणं, धूम्रपान या सर्व गोष्टींमुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
पोटाच्या कॅन्सरची लक्षणं कोणती?
अन्न गिळण्यास त्रास होणं, जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, थोडंसं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं, छातीत जळजळ, अपचन, थकवा, पोटदुखी, विनाकारण वजन कमी होणं, उलट्या होणं, ही सगळीर्व पोटाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत. पोटाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. बऱ्याचदा आपल्याला कॅन्सर आहे, हेदेखील रुग्णांना माहीत नसतं. त्यामुळे आपली खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.