Health tips: लघवी करतानाच्या 'या' चूका देतात गंभीर आजारांना निमंत्रण, विशेषत: महिलांनी वेळीच काळजी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 05:57 PM2022-04-03T17:57:03+5:302022-04-03T18:00:35+5:30
बहुतेक स्त्रिया आजही गायनॅकोलॉजिस्टकडं (Gynaecologist) म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडं जाणं टाळतात. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट्सला झालेलं इन्फेक्शन कधी-कधी जास्त घातकही ठरू शकतं.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या आरोग्याकडे (Female Health) सर्रास दुर्लक्ष होतं. लहानमोठ्या समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाण्यास आपण टाळाटाळ करतो. सामान्य आजारांसाठी एकवेळ आपण डॉक्टरांकडे जातोही पण प्रायव्हेट पार्ट्सशी संबंधित समस्यांबाबत आपण कुणाशी सहसा बोलत नाही. त्यामुळे कित्येक लोकांना अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
युरिन इन्फेक्शन (Urinary Tract Infection) ही अशीच एक समस्या आहे. पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पाणी प्यायल्यानंतर लघवीला येणं ही नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे दिवसभरात आपल्याला अनेक वेळा लघवी करावी लागते. पण, तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही लघवी करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. लघवी करताना झालेल्या काही चुकांमुळे संसर्गाची (Infection) शक्यता खूप वाढू शकते. विशेषतः महिलांना अशा समस्यांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. बहुतेक स्त्रिया आजही गायनॅकोलॉजिस्टकडं (Gynaecologist) म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञांकडं जाणं टाळतात. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट्सला झालेलं इन्फेक्शन कधी-कधी जास्त घातकही ठरू शकतं. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
स्त्रीरोग आणि युरॉलॉजी क्षेत्रातील एक्सपर्ट, प्रोफेसर स्टर्जिओस स्टेलिओस डोमोचिस (Stergios Stelios Doumouchtsis) यांच्या मते, महिलांना त्यांच्या शरीराच्या रचनेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, 'महिलांचा मूत्रमार्ग (Urethra) लहान असतो. त्यामुळे बॅक्टेरिया लघवीच्या नळीमध्ये सहज प्रवेश करू शकतात. बायोमेकॅनिकल दृष्टिकोनातून पाहिलं तर याचा महिलांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. ज्या महिलांना युरिन इन्फेक्शनच्या समस्येला सामोरं जावं लागतं त्यांना इतरही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.' प्रोफेसर स्टर्जिओस यांनी द सनला सांगितलं की, 'महिलांच्या संपूर्ण आयुष्यात मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीसारखे विविध शारीरिक बदल होतात. या सर्व गोष्टींचा युरिनरी ट्रॅक्टच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.'
यामुळे महिलांनी लघवी करताना आपल्या सवयी बदलणं आणि काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शनला सामोरं जावं लागणार नाही.
प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं
दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी (Water) पिणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. जर तुम्ही व्यायाम वगैरे करत असाल किंवा उन्हाळा असेल तर यापेक्षा जास्त पाणी पिण्यास हरकत नाही. पण, असे बरेच लोक आहेत जे दिवसभरात ६ ते ७ लिटर पाणी पितात. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यानं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त प्रमाणात पाणी पिऊन तुम्ही स्वतःला ओव्हर हायड्रेट (Overhydrate) करण्याचा प्रयत्न करता. द्रवपदार्थाच्या जास्त सेवनामुळं मूत्राशय जास्त प्रमाणात लघवी तयार करू लागतं. त्यामुळं वारंवार लघवी करण्यासाठी जावं लागतं. ही गोष्ट युरिनरी ट्रॅक्टसाठी घातक ठरू शकते.
वारंवार प्रायव्हेट पार्ट पुसणं
प्रायव्हेट पार्ट (Private Part) कोरडा ठेवण्यासाठी लघवी केल्यानंतर तो पुसणं (Wipe) आवश्यक आहे. परंतु, हे क्रिया जर जास्त प्रमाणात केली तर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. वारंवार पुसल्यामुळं प्रायव्हेट पार्टच्या त्वचेत जळजळ होऊन खाज (Itching) येऊ शकते.
प्रायव्हेट पार्टची चुकीच्या पद्धतीनं स्वच्छता करणं
प्रोफेसर स्टर्जिओस म्हणाले की, प्रायव्हेट पार्ट साफ करताना कधीच मागून पुढच्या दिशेनं पुसला जाणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण, आपल्या गुद्द्वारात (Anus) भरपूर बॅक्टेरिया (Bacteria) आढळतात. अशा स्थितीत जर प्रायव्हेट पार्टची चुकीच्या पद्धतीनं स्वच्छता केल्यास हे बॅक्टेरिया पुढे येतात आणि सहजपणे तुमच्या युरिनरी ट्रॅक्टमध्ये जाऊ शकतात. परिणामी ट्रॅक्टमध्ये संसर्ग होण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळं महिलांना प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ आणि वेदनांचा सामना करावा लागतो.
लघवी रोखून ठेवणं
मूत्राशय भरलेलं नसताना लघवी करण्याची सवय वाईट आहे. पण, लघवी रोखून ठेवणं त्याही पेक्षा वाईट आहे. असं केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
ठराविक वेळाच लघवी करणं
प्रोफेसर स्टर्जिओस म्हणतात की, लघवी करण्यासाठी (Urinate) विशिष्ट वेळ निश्चित करून ठेवणं खूपच धोकादायक ठरू शकतं. असं केल्यास मूत्राशय योग्य प्रकारे लघवी जमा करू शकत नाही. सामान्यत: मूत्राशयात 450 ते 500 मिली मूत्र जमा होतं. पण जर तुम्ही दर अर्ध्या तासानं लघवीला जात असाल तर त्यामुळं मूत्राशयात खूप कमी प्रमाणात लघवी जमा होते. यामुळं मूत्राशय (Bladder) नीट काम करत नाही आणि काही वेळातच तुम्हाला लघवी आल्यासारखं वाटू लागतं. लांबच्या ट्रेन प्रवासापूर्वी किंवा चित्रपट पाहण्याआधी लघवी करायला जाण्यात काही हरकत नाही. पण, सवय म्हणून ठराविक वेळेनंतर लघवीला जाणं चांगलं नाही.