जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरचा वापर करता? तर वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 11:05 AM2018-08-06T11:05:42+5:302018-08-06T11:07:12+5:30
सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो.
सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हाच फॉईल पेपर पदार्थांची चव बिघडवण्यासाठी कारणीभूत असून शरीरासाठीही घातक ठरतो.
आताच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल घडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे जेवण बनवण्याची पद्धत आणि ते पॅक करण्याच्या पद्धतीमध्येही बदल घडून आले आहेत. आधी जे आपण कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये पदार्थ पॅक करत असू तेच आता अॅल्युमिनिअमच्या फॉइल पेपरमध्ये पॅक केलं जातं. अनेकदा जेवण शिजवताना किंवा मांसाहारी पदार्थ ग्रिल्ड करताना फॉईल पेपरचा वापर करण्यात येतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त वेळ फॉईल पेपरमध्ये पदार्थ ठेवले तर ते खराब होतात, तसेच त्यातील पोषक तत्वही नष्ट होतात. फॉईल पेपरमध्ये पदार्थ गरम करत असाल तर ते शरीरासाठी अत्यंत घातक ठरतं. मसालेदार पदार्थांवर याचा परिणाम अधिक होत असून फॉईल पेपरमधील रासायनिक घटक पदार्थामध्ये मिसळून जातात. हे पदार्थ खाल्याने रासायनिक घटक शरीरामध्ये प्रवेश करतात.
शरीरासाठी घातक असतो फॉईल पेपर -
अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये जेवण बनवणं किंवा पॅक करणं आरोग्यासाठी घातक असतं. संशोधनातून या गोष्टींचा खुलासाही करण्यात आला आहे की, अॅल्युमिनिअम मेंदूच्या विकासाच्या प्रक्रियेवर परिणाम करतो. ज्या लोकांना हाडांसंबंधीत आजार आधीपासूनच असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत घातक ठरतं.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, फॉईल पेपरमध्ये शिजवलेले अन्नपदार्थ गरजेपेक्षा जास्त अॅल्युमिनिअम खेचून घेतात. काही संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, जर आपल्या शरीरामध्ये अॅल्युमिनिअमची मात्रा अधिक झाली तर त्याचा गंभीर परिणाम हा आपल्या मेंदूवर होतो. यामुळे मेंदूमधील पेशींची वाढ खुंटते आणि काही गोष्टींचा विसर पडणे, विचार करण्याची शक्ती कमजोर होणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
शरीरामध्ये अॅल्युमिनिअमची मात्रा वाढली तर हाडं कमजोप होणं, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे अल्जायमर सारख्या विसरण्याच्या आजाराचं मूल कारणही अॅल्युमिनिअमच आहे.
उपाय -
- फॉईल पेपरमध्ये जास्त गरम खाद्यपदार्थ पॅक करू नयेत.
- खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी चांगल्या क्वॉलिटिच्या फॉईल पेपरचा वापर करावा.
- अॅसिडीक खाद्यपदार्थ फॉईल पेपरमध्ये पॅक करू नयेत. त्यामुळे पदार्थ लवकर खराब होत असून त्यांच्यातील केमिकल बॅलेन्स बिघडतो.