उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मृत्यूसाठी 'हा' आजार ठरला; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:56 IST2024-12-16T12:54:35+5:302024-12-16T12:56:28+5:30
सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे एका गंभीर आजाराने निधन झालं असून त्याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मृत्यूसाठी 'हा' आजार ठरला; जाणून घ्या
Zakir Hussain Death : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन झालं आहे. अमेरिकेत वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसैन यांना सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली. १५ डिसेंबरला सकाळी त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी झाकीर हुसैन यांचा मृत्यू झाला. एका निवेदनानुसार, 'इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस' नावाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र हा आजार नेमका काय आहे याची चर्चा आता सुरु झाली आहे.
युनायटेड स्टेट्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा फुफ्फुसाचा एक गंभीर आजार आहे. जे हवेच्या पिशव्या किंवा अल्व्होलीच्या आसपासच्या ऊतींवर परिणाम करते. जेव्हा काही कारणांमुळे फुफ्फुसाच्या ऊती घट्ट आणि कडक होतात तेव्हा असे होते. हळूहळू, कालांतराने, फुफ्फुसांमध्ये चट्टे तयार होतात, ज्याला फायब्रोसिस म्हणतात. त्यामुळे हळूहळू श्वास घेणे कठीण होते.
इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे फुफ्फुसे इतर कोणत्याही आधाराशिवाय रक्ताभिसरणात पुरेसा ऑक्सिजन पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे आवश्यक ऑक्सिजन मेंदू आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण होते. निरोगी फुफ्फुसांमध्ये, ऑक्सिजन सहजपणे अल्व्होलीच्या भिंतींमधून जातो. मात्र इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळे फुफ्फुसांमध्ये असलेले चट्टे अल्व्होलीच्या जाड भिंती तयार करतात. अल्व्होलीच्या जाड भिंती ऑक्सिजनला रक्तात जाण्यापासून रोखतात.
धुम्रपान हे या आजाराचे एक कारण आहे. याशिवाय कुटुंबातील एखाद्याला आधी इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस झाला असेल तर त्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता असते. आयपीएफची सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे आणि खोकला हा आहे. आयपीएफची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतात. काहींमध्ये हा आजार वेगाने वाढतो तर काहींमध्ये तो हळूहळू वाढतो. आयपीएफने त्रस्त असलेल्या अनेकांमध्ये तीव्र उत्तेजणाही जाणवते.
यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे श्वास घेण्यात अडचण येते, जी कालांतराने वाढत जाते. कोरडा खोकला जो वाढत जातो. यातील खोकल्यावर जो तुम्ही नियंत्रण करू शकत नाही. स्नायू आणि सांधे दुखण्याव्यतिरिक्त, थकवा आणि वजन कमी होणे देखील या आजाराची लक्षणे असू शकतात.
सध्या, आयपीएफवर कोणताही इलाज नाही. मात्र असे काही उपचार आहेत जे आयपीएफचा प्रभाव कमी करू शकतात आणि आपल्या फुफ्फुसांना चांगले कार्य करण्यास मदत करू शकतात. श्वास घेण्यास होत असलेला त्रास कमी करण्यासाठी आणि व्यायाम करण्याची क्षमता सुधारण्यासाठी ऑक्सिजन थेरपी घेतली जाऊ शकते. आयपीएफ गंभीर स्तरावर असेल तर फुफ्फुस प्रत्यारोपण हा एक पर्याय असू शकतो. फुफ्फुस प्रत्यारोपणानंतर संसर्ग ही मोठी समस्या असू शकते. याशिवाय शरीर नवीन अवयव इतक्या लवकर स्वीकारत नाही. यासाठी तुम्हाला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात.