Coronavirus: कोरोनामुक्तीनंतर ३ महिन्यांनी लस घ्या; लस घेतल्यानंतर किती दिवसांनी रक्तदान करावं? मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 06:38 AM2021-05-20T06:38:56+5:302021-05-20T06:41:51+5:30
अन्य आजारावर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या किंवा अतिदक्षता विभागात असलेल्या व्यक्तींनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर ४ ते ८ आठवड्यांनी लस घ्यावी.
नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गावर मात करून घरी परतलेल्या व्यक्तीने नेमकी कधी लस घ्यावी, याबाबत असलेला संभ्रम आता दूर होणार आहे. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती तीन महिन्यानंतर लस घेऊ शकते, हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना झालेल्या व्यक्तींसह इतर गटांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामुळे लोकांमधील संभ्रमावस्था दूर होण्यास मदत होणार आहे.
लसीकरणाबाबत नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड (नेगव्हॅक) या विशेष गटाने सरकारला दिलेल्या सर्व सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या नवीन सूचना सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू केल्या जातील.
पहिल्या डोसनंतर बाधा झाल्यास तीन महिने थांबावे
यामुळे बाधितांनी लस घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, याबाबत अधिक स्पष्टता आली आहे. एखाद्या व्यक्तीला लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर तिने कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी दुसरा डोस घ्यावा, असे नेगव्हॅकने म्हटले आहे. या सूचना जारी करण्याआधी काही दिवसांपूर्वीच मंत्रालयाने कोव्हिशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी दोन लसींमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे इतका केला होता.
आता गुळणीतूनही काेराेना चाचणी
घशावाटे किंवा नाकावाटे स्राव घेऊन काेराेनाची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे साध्या गुळणीच्या माध्यमातून काेराेनाचे निदान करणे शक्य होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी) ने हे संशाेधन केले आहे. आयसीएमआरने या संशाेधनाला मान्यता दिली असून, याचा लवकरच देशभरात वापर केला जाईल. निरीच्या व्हायराॅलाॅजी विभागाचे डाॅ. कृष्णा खैरनार यांनी हे नवे तंत्र विकसित केले आहे. काेराेना टेस्टिंगसंदर्भात हे संशाेधन उपयुक्त मानले जात आहे. या पद्धतीला ‘सलाइन गारगल आरटी-पीसीआर टेस्ट’ असे नाव दिले आहे.