व्हायरल हेपेटायटीस, एक सायलेंट आजार, जाणून घ्या लक्षणे अन् उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 12:04 PM2021-07-28T12:04:33+5:302021-07-28T13:41:24+5:30
व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंचा संसर्ग जेव्हा यकृतामध्ये होतो तेव्हा यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहोचवू शकतात आणि त्याच्या कार्यांवर परिणाम करू शकतात, यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात. यामुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर देखील होऊ शकतात.
व्हायरल हेपेटायटीस काय आहे?
यकृत आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करणे, रक्त फिल्टर करणे आणि संसर्गाविरोधात लढणे ही यकृताची कार्ये आहेत. व्हायरल म्हणजेच विषाणूजन्य हेपेटायटीसमध्ये हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई विषाणूंचा संसर्ग जेव्हा यकृतामध्ये होतो तेव्हा यकृताला सूज येते. हे विषाणू यकृताला हानी पोहोचवू शकतात आणि त्याच्या कार्यांवर परिणाम करू शकतात, यामुळे शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ निर्माण होऊ शकतात. यामुळे लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सर देखील होऊ शकतात.
यकृतासाठी धोका
हेपेटायटीस ए आणि ई विषाणूंच्या संसर्गामुळे गंभीर स्वरूपाचा विषाणूजन्य हेपेटायटीस होऊ शकतो. कित्येक रुग्णांमध्ये हा आजार काही आठवड्यात किंवा काही महिन्यांमध्ये आपोआप बरा होतो. पण काही दुर्मिळ केसेसमध्ये रुग्णाच्या यकृताचे कार्य वेगाने बंद पडू लागते, अशावेळी जर तातडीने यकृत प्रत्यारोपण केले गेले नाही तर जीवावर देखील बेतू शकते.
हेपेटायटीस बी आणि सी मुळे यकृताचे गंभीर नुकसान क्वचितच काही केसेसमध्ये होते. पण हे विषाणू व्यक्तीच्या शरीरात राहतात आणि बऱ्याच कालावधीनंतर लिव्हर सिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरतात.
लक्षणे:
हेपेटायटीस ए आणि ई हे सामान्यतः प्रदूषित खाद्यपदार्थ आणि पाण्यामार्फत मल-मुखावाटे पसरतात. अस्वच्छ भागांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला एकतर काहीच लक्षणे नसतात किंवा कावीळ, पोटदुखी, मळमळ, उलट्या, भूक न लागणे, ताप, सर्वसामान्य अशक्तपणा अशी लक्षणे दिसून येतात. बऱ्याच रुग्णांच्या बाबतीत हा विषाणू शरीरातून निघून जातो आणि रुग्ण पूर्णपणे बरा होतो. काही टक्के रुग्णांमध्ये या आजारांचे रूपांतर यकृताचे कार्य बंद पडण्यामध्ये होते. अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागू शकते. खूपच कमी केसेसमध्ये रुग्णाला जिवंत राहण्यासाठी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज भासू शकते.
हेपेटायटीस बी आणि सी संसर्ग झालेले रक्त आणि इतर रक्त घटकांमधून पसरतात. संसर्ग झालेल्या गर्भवती मातेकडून तिच्या बाळाला जन्मतः हा संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून न येण्याची शक्यता असते किंवा खूपच अस्पष्ट लक्षणे असू शकतात. पण विषाणू रक्तामध्ये राहतो आणि हळूहळू यकृताचे नुकसान करत राहतो. गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीसमध्ये सिरोसिस, यकृताचे कार्य बंद पडणे आणि यकृताचा कर्करोग अशी गुंतागुंत देखील होऊ शकते.
प्रतिबंध:
विषाणूजन्य हेपेटायटीसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी -
१. जागरूक रहा.
२. नेहमी शुद्ध पाणी प्या, शौचालय, घर, आजूबाजूचा सर्व परिसर कायम स्वच्छ ठेवा.
३. सर्वांचे लसीकरण झालेले असणे महत्त्वाचे आहे.
४. रक्त व रक्त उत्पादनांची सुरक्षा अबाधित राखली जावी.
५. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत.
उपचार:
गंभीर स्वरूपाचा हेपेटायटीस झालेला असल्यास आराम करावा, भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करावे आणि निरोगी, पोषक व संतुलित आहार घ्यावा. सहायक औषधांमुळे लक्षणांपासून आराम मिळण्यात मदत होऊ शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे किंवा पर्यायी औषधे घेऊ नयेत. अशा औषधांमुळे यकृताला नुकसान पोहोचू शकते.
गंभीर स्वरूपाच्या हेपेटायटीस (हेपेटायटीस बी आणि सी) मध्ये दीर्घकालीन गुंतागुंत रोखण्यासाठी लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे आवश्यक आहे. विषाणूजन्य हेपेटायटीसचे निदान जर विषाणूने यकृतावर परिणाम करण्याच्या आधी झाले तर हा आजार बरा करण्यासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. काही केसेसमध्ये जर यकृताचे गंभीर नुकसान आधीच झालेले असेल तर यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.
-डॉ. कांचन मोटवानी, कन्सल्टन्ट, एचपीबी अँड लिव्हर ट्रान्सप्लांट,
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई