नातवंडांना मांडीवर खेळवायचं ना? -मग महिलांनी या गोष्टी करायलाच हव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 05:38 PM2017-07-29T17:38:44+5:302017-07-29T17:44:03+5:30
नियमित तपासणी करून स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं.
- मयूर पठाडे
कोणतीही स्त्री घ्या, ती एकवेळ आपल्या दिसण्याकडे लक्ष देईल, आपण ठीकठाक दिसतो की नाही याची काळजी घेईल, याला त्याला ब्युटी टिप्स विचारेल, चेहºयाच्या सौंदर्याची तर वारेमाप काळजी घेईल, त्यासाठी इंटरनेटपासून तर जो जे काही सांगेल, ते सारं भक्तिभावानं करील, पण आपल्या आरोग्याची काळजी घ्या, सांगितलं, तर त्याकडे सहजपणे दुर्लक्ष करील.
बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असाच प्रकार आपल्याला दिसून येतो. घरासाठी, परिवारासाठी झटत असताना त्या प्रत्येकासाठी सारं काही करतील, पण आरोग्याच्या बाबतीत स्वत:साठी काही करायचं म्हटलं, तर नेहमीच चालढकल केली जाते. नंतरच्या काळात केव्हा ना केव्हा याचा फटका त्यांना बसतोच.
त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काही गोष्टी महिलांनी करायला हव्यातच. स्वत:च्या काही चाचण्या त्यांनी नियमितपणे करवून घ्यायला हव्यातच. आपल्या मुलांवर, नातवंडांवर कोणत्याही स्त्रीचा अपार जीव असतो. आपल्या नातवंडांबरोबर खेळायला, त्यांच्यासाठी काही करायलाही त्यांना फारच आवडतं. पण नातवंडांबरोबर खेळायचं असेल तर स्वत:च्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष द्यायलाच हवं.
महिलांनी या चाचण्यांवर द्यावं लक्ष
१- स्मिअर टेस्ट-
गर्भाशयाच्या कॅन्सरनं त्रस्त झालेल्या अनेक स्त्रिया दिसतात. याचं कारण वेळीच त्याकडे लक्ष न दिल्यामुळे. त्यासाठीची स्मिअर टेस्ट ही एक चाचणी आहे. दर तीन वर्षांतून एकदा ही चाचणी केली पाहिजे. ही चाचणी केल्यास त्यासंदर्भात वेळीच माहिती मिळू शकेल.
२- ब्लड प्रेशर-
या गोष्टीकडे अनेक जण अगदी कॅज्युअली बघतात. पण तुम्हाला हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकण्याची ती निदर्शक आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी जास्त असण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
३- कोलेस्टेरॉल-
आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉलचं प्रमाण किती आहे हे वेळोवेळी तपासलं पाहिजे. एका साध्या टेस्टद्वारे हे कळू शकतं. तुमच्या शरीरातून अगदी थोडंसं रक्त इंजेक्शनद्वारे काढलं जातं, त्यातून हृदयविकाराची शक्यताही स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर ही चाचणी नियमित करायलाच हवी.
४- संपूर्ण शरीराची तपासणी-
बºयाचदा आपल्याला काही आजार आहे किंवा काय, याची लक्षणं आपल्याला दिसत नाहीत. अनेकदा तर ती कळतही नाहीत. अचानक काही झाल्यावर कळतं, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक महिलेनं चाळीशीनंतर ही तपासणी करवून घ्यायला हवी.
5- डोळ्यांची तपासणी-
चाळीशीनंतर जवळपास सगळ्यांनाच चष्मा लागतो. दृष्टी कमी झालेली असते. पण काही गोष्टी फक्त चष्मा लावून सुटत नाहीत. मोतीबिंदूसारख्या गोष्टींसाठी तुम्हाला आॅपरेशनच करावं लागतं, नाहीतर तुमची दृष्टी आणखी खराब होऊ शकते.
त्यामुळे आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे महिलांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे आणि वेळोवेळी तपासणीही केली पाहिजे.