बंद एसी सुरू करताय? थोडं थांबा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:43 AM2019-03-24T10:43:56+5:302019-03-24T10:46:06+5:30
धूलिकणांसह जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती
- सचिन लुंगसे
मुंबई : पावसाळा आणि हिवाळ्यात वातावरणात गारवा असल्याने एसीचा वापर तुलनेने कमी केला जातो. किंवा एसी बंद ठेवला जातो. मात्र पावसाळा आणि हिवाळा संपल्यानंतर मार्च महिन्यातच उन्हाचा तडाखा बसू लागल्यानंतर मागील काही महिने बंद ठेवलेला एसी पुन्हा सुरू केला जातो. परंतु एवढे महिने बंद असलेला एसी सुरू करताना त्यातील जाळी स्वच्छ करण्याची तसदी घेतली जात नाही. परिणामी, त्यातील धूलिकणांसह जंतूंमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले.
मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तापमान वाढण्यास सुरुवात होते. या काळात दमा, अॅलर्जी, रेस्पेटरी इन्फेक्शन, श्वसनाचा त्रास आणि काही प्रमाणात निमोनियाचा त्रास होतो. याचे मूळ कोठे आहे, यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले की, आपल्याकडे उन्हाळा वगळता पावसाळा आणि हिवाळ्यात एसी बंद ठेवला जातो. पावसाळा आणि हिवाळा संपला की उन्हाळ्यादरम्यान गारव्यासाठी एवढे महिने बंद ठेवण्यात आलेला एसी सुरू केला जातो. उन्हाळ्यादरम्यान एसी सुरू करताना तो स्वच्छ केला जात नाही. एसीला एक फिल्टर असतो. त्यातून बाहेरची हवा आत येत असते. यात धूळीचे कण साचलेले असतात. जेव्हा तुम्ही एसी सुरू करता तेव्हा येणाऱ्या भपक्यात साचलेले सगळे कण बाहेर येतात. परिणामी, अॅलर्जी, खोकला, सर्दीचे प्रमाण वाढते. न्यूमोनियाचा धोका वाढतो.
अचानक आलेली आठवण देते अॅलर्जीस आमंत्रण
उकडायला लागले की गारेगार हवा हवीहवीशी वाटते. साहजिकच पावसाळा, थंडीच्या दिवसांत बंद केलेल्या एसीची अचानक आठवण येते. काहीही विचार न करता बरेच महिने बंद असलेला एसी पटकन चालू केला जातो. पण बराच काळ तो बंद असल्याने एसीत बाहेरची हवी आत घेणाºया फिल्टरमध्ये धूळीचे कण साचलेले असतात. एसी सुरू करताच ते हवेत पसरतात आणि अॅलर्जीस आमंत्रण मिळते, असे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जाळी साफ करणे गरजेचे
एसीच्या माध्यमातून लीजनेल्ला आणि असीनॅटोबॅक्टर हे दोन जंतू पसरतात. ते एसीचेच जंतू आहेत. या जंतूंमुळे न्यूमोनियाची लागण होते. परिणामी, उन्हाळा सुरू झाल्यावर तुम्ही एसी सुरू करण्यापूर्वी त्यातली जाळी बाहेर काढा. ती पाण्यात टाका. एक ते दोन तास भिजत ठेवा. ब्रशच्या माध्यमातून जाळी स्वच्छ करा. त्यानंतर तिला उन्हात एक दिवस वाळवा, म्हणजे ती निर्जंतुक होईल. त्यानंतरच तिचा वापर करून एसी सुरू करा. महत्त्वाचे म्हणजे दर महिन्याला जाळी झटकून स्वच्छ करणे गरजेचे आहे. कारण एसीमुळे इन्फेक्शन होऊ शकते, असेही अन्नदाते यांनी सांगितले.