Heart Disease: जलदगतीने चालणं हृदयविकारावर रामबाण! संशोधनातून सांगितले अनेक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 06:08 PM2022-01-25T18:08:49+5:302022-01-25T18:09:18+5:30
अलीकडे हृदयविकाराचं (Heart Fail) प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यावर जलद गतीनं चालण्याचा (Brisk Walking) व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचं अमेरिकेतल्या (USA) एका संशोधनात सिद्ध झालं आहे.
उत्तम आरोग्यासाठी (Health) व्यायाम (Exercise) महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात जीवनशैली, आहाराच्या पद्धती बदलल्यामुळे अनेकांना आजार कमी वयातच ग्रासत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे हृदयविकाराचं (Heart Fail) प्रमाण वाढलेलं दिसत आहे. यावर जलद गतीनं चालण्याचा (Brisk Walking) व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचं अमेरिकेतल्या (USA) एका संशोधनात सिद्ध झालं आहे. विशेषत: ज्येष्ठ महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका ३४ टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
अमेरिकेतल्या ब्राउन युनिव्हर्सिटीने (Brown University, USA) नुकत्याच केलेल्या एका संशोधनात जलद चालण्याच्या व्यायामामुळे महिलांना (Women) वृद्धापकाळातही (Older Age) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोका कमी होऊ शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार ब्राउन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 25 हजारांहून अधिक ज्येष्ठ महिलांवर जवळपास 20 वर्षं संशोधन केलं. या संशोधनात सहभागी महिलांना त्या दररोज किती चालतात याबाबत माहिती विचारण्यात आली. त्यांच्या उत्तरांच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला. यात असं आढळून आलं, की ज्या महिला वेगाने चालतात त्यांना हृदयविकाराचा धोका 34 टक्के कमी असतो. काही महिला संथ गतीनं चालतात. कारण त्यांचे स्नायू कमजोर झालेले असू शकतात; मात्र संथ गतीनं चालणाऱ्यांपेक्षा वेगवान चालणाऱ्यांना अधिक फायदे मिळतात, असं अभ्यासात स्पष्ट झालं आहे. या काळात १४५५ महिलांचं हार्ट फेल (Heart Fail) झालं. अर्थात त्यांच्या हृदयाची शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता संपली, असं या संशोधनात आढळून आलं.
याबाबत बोलताना या संशोधनकार्याचे प्रमुख डॉ. चार्ल्स इटॉन म्हणाले, १४५५ महिलांना हृदयविकाराचा झटका आला, याचा अर्थ वाढत्या वयानुसार त्यांच्या हृदयाची संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता कमी होऊ लागली. यावर जलद गतीने चालण्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं.'
५० ते ७९ वर्षं वयोगटातल्या महिलांमध्ये हार्ट फेल्युअर अर्थात हृदय बंद पडण्याची समस्या सर्वाधिक आहे. त्यामुळे वाढत्या वयात हा धोका टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं असून, त्यात जलद गतीनं चालण्याच्या व्यायामाला प्राधान्य देणं सर्वांत महत्त्वाचं आहे,' असंही डॉ. चार्ल्स इटॉन यांनी स्पष्ट केलं.
चालण्याचा व्यायाम सहजसोपा व्यायाम प्रकार म्हणून ओळखला जातो. जलद गतीनं चालण्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं, ही अत्यंत दिलासादायक बाब आहे. यामुळे अनेकांना आपलं आयुष्य निरोगी राखण्यासाठी व्यायाम करण्याला नक्कीच प्रोत्साहन मिळेल.