रोज किती पावलं चालल्याने कमी होतो हार्ट अटॅकचा धोका? उत्तर वाचून लगेच चालायला कराल सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 10:24 AM2023-03-03T10:24:24+5:302023-03-03T10:28:03+5:30
Health Tips : भारतातील 50 टक्के लोक असं करू शकत नाही आणि यामुळेच वय वाढताना त्यांना हृदय रोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस इत्यादी समस्या होतात.
Health Tips : भारतातील लोकांमध्ये आजही रेग्युलर एक्सरसाइजचं चलन सुरू झालेलं नाही. संयुक्त राष्ट्रानुसार, प्रत्येक भारतीय व्यक्तीने दर आठवड्यात कमीत कमी 150 मिनिटे व्यायाम करायला हवा. पण भारतातील 50 टक्के लोक असं करू शकत नाही आणि यामुळेच वय वाढताना त्यांना हृदय रोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस इत्यादी समस्या होतात.
अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स यूनिवर्सिटीमध्ये एक रिसर्च करण्यात आला. ज्यातून समोर आलं की, 60 पेक्षा अधिक वयाचे लोक जर दररोज 6 हजार ते 9 हजार पावलं चालतील तर त्यांच्यात हृदयरोगांचा धोका 50 टक्के कमी होतो.
हा रिसर्च प्रोफेसर डॉ. अमांडा पालुच आणि यूनिवर्सिटीमध्ये डॉक्टरेटची अभ्यासिका शिवांगी बाजपेयीने केला. इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना शिवांगीने सांगितलं की, शारीरिक हालचालीबाबत लोकांमध्ये जागरूकता कमी आहे. अशात भारतात शारीरिक हालचालीला वाढवण्यासाठी आपण किती चालत आहोत, तेवढ्या पावलांची मोजणी करणं फायदेशीर ठरू शकतं.
या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी अमेरिका आणि 42 देशातील 20 हजारांपेक्षा अधिक लोकांच्या डेटाचं विश्लेषण केलं. यात त्यांना आढळलं की, 2 हजार पावलं चालणाऱ्या लोकांच्या तुलनेत रोज 6 हजार आणि 9 हजार पावलं चालणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसहीत हृदयरोगांचा धोका 40 ते 50 टक्के कमी होता.
शिवांगी म्हणाली की, भारतात बरेचसे लोक काम करताना चालतात किंवा ऑफिसला चालत जातात. पण जेव्हा ते रिटायर होतात तेव्हा घरातील एका कोपऱ्यात बसलेले असतात. त्यांनी शारीरिक हालचाल होणारं काहीतरी केलं पाहिजे. रिटायरमेंटनंतर त्यांच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. त्यांनी शारीरिक हालचाल वाढवावी.
जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये घराची जबाबदारी महिलांवरच असते. ज्यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. लोकांमध्ये चुकीची धारणाही आहे की, महिलांना वेगळ्या एक्सरसाइजची गरज नसते, कारण घरात काम करताना त्यांची खूप मेहनत होते. हे काही प्रमाणात बरोबरही असेल. पण महिलांनी सुद्धा नियमित चालावं. आपण किती चालतो याचा हिशेब ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.