आयुष्यात खूप नाव कमवायचंय? प्रसिद्ध व्हायचंय?..
By admin | Published: May 30, 2017 05:35 PM2017-05-30T17:35:31+5:302017-05-30T17:35:31+5:30
..पण त्यासाठी झोपेचं खोबरं करीत असाल तर स्वत:चं नावही विसराल.. अल्झायमर आणि मेंदूचे विकार करतील घर..
- मयूर पठाडे
झोपेच्या बाबतीत आपण अनेक मोठमोठ्या व्यक्तींची उदाहरणं देतो. ही लोकं किती कमी झोपत होती, म्हणूनच त्यांच्याकडून इतकी मोठी कामं होऊ शकली, तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग करताना झोपेचा ‘फालतू’ वेळ कमी करा, असाही सल्ला आपल्याला बऱ्याचदा मिळतो, पण हे अर्धसत्य आहे..
तुम्हाला कमी झोप मिळाली किंवा तुम्हाला निद्रानाशाच विकार असेल, तर सावधान, तुम्हाला भविष्यात अल्झायमरचा धोका होऊ शकतो किंवा मेंदूसंबंधातील विकारांना तरी तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं.
संशोधनाचा निष्कर्ष तसा अफलातून होता. तुम्ही जर कमी झोप घेत असाल, तर थोड्या कालाीवधीसाठी कदाचित ही गोष्ट तुमच्या फायद्याची ठरू शकते, पण रोज तर तुम्ही कमी झोप घेत असाल, झोपच येत नसेल, निद्रानाश जडला असेल, किंवा तुमच्यावरच्या जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला पुरेशी झोप घेता येत नसेल.. तर मात्र तुमच्या आयुष्याला धोका आहे.
या कमी झोपेमुळे अल्झायमरचा धोका तुमच्यासाठी खूप मोठा आहे. याशिवाय मेंदूचे इतर विकारही कमी झोपेमुळे जडू शकतात.
त्यामुळेच संशोधकांचा सल्ला आहे, जागरणं टाळा, झोपेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तसं केलंत तर तुम्ही हळूहळू स्वत:लादेखील परके होत जाल..