मेडिक्लेम काढायचाय?, काय करावं लागेल? वाचा संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 09:06 AM2021-12-13T09:06:55+5:302021-12-13T09:07:15+5:30
Mediclaim Policy : तहान लागल्यावर विहीर खोदणे, याच अनुभवातून आपण अनेकदा जातो. पण आरोग्याच्या बाबतीत असे करणे म्हणजे आयुष्याशी खेळण्यासारखे आहे.
पुष्कर कुलकर्णी
तहान लागल्यावर विहीर खोदणे, याच अनुभवातून आपण अनेकदा जातो. पण आरोग्याच्या बाबतीत असे करणे म्हणजे आयुष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी काढणे महत्त्वाचे आहे. मेडिक्लेम पॉलिसीविषयी आपल्याकडे प्रचंड प्रमाणात अनभिज्ञता निदर्शनास येते. या सर्व पार्श्वभूमीवर मेडिक्लेम काढायचा असेल तर आपली गरज किती, मेडिक्लेम पॉलिसी काढावी कशी, यासंदर्भात आपण जाणून घेऊ या...
१. विविध कंपन्यांच्या मेडिक्लेम पॉलिसीसंदर्भात अधिकृत एजंट मार्फत माहिती घ्या.
२. आपल्याला परवडेल अशी किमान ३ ते ५ लाख रकमेपर्यंत मेडिक्लेम पॉलिसी निवडा.
३. शक्यतो परिवारासाठी फ्लोटिंग पॉलिसीचा पर्याय निवडा. जेणेकरून सर्वांना त्या रकमेचे कव्हरेज मिळेल.
४. घरातील सर्व सदस्यांना मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट करा.
५. मेडिक्लेमसंदर्भात सर्व नियम आणि अटी याचा बारकाईने अभ्यास करा. कारण काही आजार तत्काळ तर काही आजार एक किंवा दोन वर्षांनी पॉलिसी अंतर्गत समाविष्ट होतात.
६. TPA म्हणजेच थर्ड पार्टी असोसिएटचे विमा कार्ड आणि पॉलिसी क्रमांक कायम सोबत ठेवा.
मेडिक्लेम पॉलिसीची मुदत एका वर्षाची असते. ती संपण्यापूर्वी किमान एक आठवडा पॉलिसीचे नूतनीकरण करून घ्यावे. पॉलिसी वर्षानुवर्षे सुरु ठेवल्याचे अनेक फायदे असतात. ते विमा एजंटकडून जाणून घ्यावेत. पॉलिसी कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, याची काळजी घ्यावी.
हे लक्षात असू द्या!
आपल्याला काही होऊ नये आणि रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ नये, अशीच सर्वांची इच्छा असते. परमेश्वर कृपेने असेच घडावे. परंतु आपण पॉलिसी काढून पैसे वाया घालविले असे मनात अजिबात आणू नये.
मनोरंजनासाठी आणि कुटुंबासाठी एक कर्ती व्यक्ती म्हणून अनेकवेळा रक्कम खर्च करीत असतो. मग कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी दरवर्षी मेडिक्लेम पॉलिसी काढली तर त्यात गैर काय आहे?