वजनच कमी करायचंय ना? मग त्यात काय एवढं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 05:32 PM2017-09-20T17:32:07+5:302017-09-20T17:35:20+5:30
‘स्मार्टपणे’ वागलात तर काहीच अशक्य नाही..
- मयूर पठाडे
तुम्हाला वजन कमी करायचंय ना? कशाला मग उगीचंच नमनाला घडाभर पाणी? आणि वजन वाढलंय, ते कमी करायचंय, त्यात लपवण्यासारखंआहे तरी काय?
वाढलेलं वजन किंवा वाढू लागलेलं वजन आटोक्यात कसं ठेवायचं हाच आज अनेकांपुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
वजन वाढलंय हे मान्य करणं ही पहिली पायरी. त्यानंतरच पुढच्या गोष्टी सुरू होतात. वजन वाढीवरची समस्या आटोक्यात आणण्यासाठी आजवर अनेकांकडून अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. काही गोष्टी ऐकूनच सोडून दिल्या असतील. पण आता अशा काही गोष्टी करा, ज्यामुळे तुमचं वजन खरोखरच आटोक्यात राहील आणि तुमच्या आरोग्याचा प्रश्नही सहजासहजी सुटेल.
त्याचसाठीच्या या सोप्या टिप्स.
वजन कमी करण्यासाठी काय कराल?
१- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापुढचे गोल्स, उपाय स्मार्ट असू द्या. स्मार्टली ही समस्या सोडवली तर सहजपणे ती सुटेलही. स्मार्ट गोल म्हणजे काय?- आपलं ध्येय टाइमली म्हणजे वेळेशी निगडित ठेवा. त्याशिवाय हे ध्येय सहज, सोपं, साध्य करण्यासारखं, आवाक्यातलं आणि मोजता येणारं हवं.
२- कोणतीही गोष्ट हवेत नको. मला वजन कमी करायचंय.. पण किती? एक किलो, दोन किलो, तीन किलो?.. ते स्पष्टपणे ठरवा. अगोदर उद्दिष्ट छोटंच ठेवा. ते पूर्ण झालं की मग पुढचं टारगेट ठेवा.
३- किती वजन कमी करायचं हे ध्येय ठेवलं, म्हणजे झालं का? त्यासोबतच आणखी एक ध्येय समोर ठेवा. लाइफस्टाईल चेंज करायचं. एकदा का तुम्ही लाईफस्टाईल सेट केलीत तर तुमचा निम्म्यापेक्षा अधिक प्रश्न सुटला म्हणून समजा. ही लाईफस्टाईल तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत सहज घेऊन जाईल.
४- त्यासाठीचा काटेकोर प्लान तयार करा. हा प्लान शक्यतो तोडला जाणार नाही याकडे कमालीचं लक्ष द्या.
सुरुवातीला या गोष्टी तर करा. बघा, तुमचं वजन बºयापैकी आटोक्यात आलेलं असेल. त्यानंतर काय करायचं, तेही लगेच कळेल.. त्यासाठी थोडंसं थांबा..