मोबाईल डेटा वाचवायचाय?- TRY THIS
By admin | Published: May 17, 2017 05:42 PM2017-05-17T17:42:26+5:302017-05-17T17:42:26+5:30
मोबाईल डेटा वाचवा, पैसे वाचवा, आॅनलाइन फ्री रहा!
- निनाद महाजन
मोबाईल डेटा कुठंं उडतो हे अनेकदा कळतच नाही. आपण मारतोय रिचार्जवर रिचार्ज पण डेटा गायब. आपला डेटा नक्की जातोय कुठं? फॉरवर्डच्या खेळात. तो तर जातोच. म्हणजे आपण फॉरवर्ड मारावेत म्हणून कसलेही पुचाट जोक मार्केटमध्ये ओतले जातात आणि आपण हिरिरीने ते फॉरवर्ड करतो. त्यात आपला डेटा जाळतो. घरबसल्या आपला डेटा जाळू नका, त्यापेक्षा जरा डोकं वापरा. डेटा वाचवा आणि आपले पैसेही! ते कसे वाचवता येतील? त्यासाठीच्या या काही एकदम साध्या टिप्स. पण करुन पहा. डेटा वाचेल.
१) वायफाय आहे काय?
एकतर तुमचा मोबाईल डेटा वापर मोठा असेल, मोठी कामं तुम्ही आॅनलाइन करत असाल तर घरी वायफाय घ्या. त्यानं बरेच पैसे वाचतील. आणि त्याहून मोठी न लाजता करायची गोष्ट म्हणजे कुणाच्याही घरी गेलं आणि त्यांच्याकडे वायफाय असेल तर न लाजता पासवर्ड मागा. तेवढ्यातल्या तेवढ्यात ते वापरुन आपले अॅप्स आणि इतर सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्या. त्यापायी खर्च होणारा आपला डेटा वाचवा.
२) डेटा मॉनिटर
आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जावून बघा. एक डेटा मॉनिटर असतो. आपण कधी, कशासाठी, किती डेटा वापरतो आहोत याची माहिती तो देतो. त्यावर लक्ष ठेवा. अधुनमधुन तो चेक करा. आपला अनावश्यक वापर कशावर होतो ते तुमचं तुम्हाला कळेल. तो वापर बंद करा.
३) आॅटो डाऊनलोड बंद
आपल्या व्हॉट्सअॅपच्या सेटिंंगमध्ये जावून आॅटो डाऊनलोड हा आॅप्शन बंद करा. म्हणजे फक्त वायफाय असेल तरच आपल्याला आले सारे फोटो आॅटो डाऊनलोड होतात. डेटा पॅक सुरु असेल आणि आपण फोटो डाऊनलोडवर क्लिक केलं नाही तर फोटो स्वत:हून डाऊनलोड होत नाही. त्यानं आपला डेटा वाचतो आणि मोबाईलमधली जागाही.
४) डिसेबल पुश कनेक्ट
आपल्याला कळतही नाही, आणि नको त्या गोष्टी आॅटो डाऊनलोड होत राहतात. त्या टाळायच्या तर डिशेबल पुश कनेक्ट बंद करुन टाका. विशेषत: फेसबुक फोनवर वापरताना हे कराच.फेसबुकच्या सेटिंगमध्ये जा, अकाऊण्ट सेटिंगमध्ये जावून डेटा मेन्यू चेक करा. तिथं हा आॅप्शन मिळेल. तो बंद करा.
५) फॉरवर्ड खेळ थांबवा
आपल्याला काय वाटतं आलं फॉरवर्ड फुकट आहे? तसं नाही. आलं फॉरवर्ड डाऊनलोड करुन पाहिलंच पाहिजे का? विचारा स्वत:ला. नको ते म्युझिक व्हिडिओ, नको ते फोटो डाऊनलोड करू नका. केले तरी पुढं पाठवू नका. त्यानं आपला डेटा निम्म्यानं वाचेल.