आजारांना दूर ठेवायचं असेल तर करा उपवास - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 10:28 AM2019-01-17T10:28:20+5:302019-01-17T10:28:46+5:30
वाढत्या वयासोबत वाढणाऱ्या आजारांपासून बचाव करायचा असेल आणि म्हातारपणातही निरोगी रहायचं असेल तर उपवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं.
(Image Credit : gimmeinfo.com)
वाढत्या वयासोबत वाढणाऱ्या आजारांपासून बचाव करायचा असेल आणि म्हातारपणातही निरोगी रहायचं असेल तर उपवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. हे आम्ही नाही एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे सेल रिपोर्ट्समध्ये प्रकाशित एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, उपवास करणे किंवा फास्टिंग केल्याने शरीराच्या पचनक्रियेवर सकारात्मक प्रभाव पडतो आणि वाढत्या वयासोबत येणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यास मदत मिळते. असे मानले जाते की, आहार मनुष्याच्या बॉडी क्लॉकला प्रभावित करते. पण हे अजून स्पष्ट झालं नाही की, कमी आहार घेण्याचा यावर काय प्रभाव पडतो.
पेशी होतात प्रभावित
कॅलिफोर्निया विश्वविद्यालयातील प्राध्यापक पाओलो सास्सोने कोर्सी म्हणाले की, जेवण न केल्याने शरीरातील सिक्रेडियन क्लॉकच्या प्रतिक्रियांवर प्रभाव पडतो. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला. त्यांना २४ तास काहीच खायला दिलं गेलं नाही. तेव्हा अभ्यासकांना असं आढळलं की, उंदरांनी ऑक्सिजनचा वापर, पचनक्रियेदरम्यान तयार झालेल्या कार्बनडायऑक्साइडचा आणि ऊर्जेचा वापर कमी केला. जेवण दिल्यावर हे चित्र बदललं.
मनुष्यांवर दिसतो सकारात्मक परिणाम
मनुष्यांमध्येही याचप्रकारचा परिणाम बघायला मिळाला कोर्सी म्हणाले की, जर वेळेचं नियोजन करुन उपवास केला गेला तर यातून शरीरातील पेशींवर सकारात्मक प्रभाव पडतो. हे चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. याने वाढत्या वयात होणाऱ्या आजारांपासून बचाव केला जाऊ शकतो.
उपवास चांगलं औषध
आयुर्वेदात उपवास म्हणजेच पोट रिकामं ठेवण्याची प्रथा आहे. पण उपवास प्रत्येक आजारावरील उपचार म्हणता येणार नाही. पण याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. आयुर्वेदात आजार दूर करण्यासाठी शरीरातील विषारी पदार्थ दूर करण्याबाबत सांगितलं आहे आणि उपवास करुन हे केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपवासाला सर्वोत्तम औषध मानलं गेलं आहे.
वजन कमी, आयुष्य जास्त
उपवास करताना जेव्हा १२ तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ काही खाल्लं नाही तर किटोसिसची प्रक्रिया सुरु होते. ज्यात आपल्या शरीरातील पेशी शरीरातील फॅट म्हणजेच चरबी नष्ट करुन त्याव्दारे ऊर्जा घेणे सुरु करतात.
उपवास केल्याने आयुष्यही वाढतं. याने शरीरात होणारी ऑटोफॅजी नावाच्या प्रक्रियेला मदत मिळते. ऑटोफॅजी पेशीमध्ये स्वच्छतेसाठी होणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे शरीरातील पेशींमध्ये निर्माण होणारे अपशिष्ट पदार्थ, नुकसान करणारे तत्व आणि विषारी तत्त्व शरीराद्वारे नष्ट केले जातात.
हे आजार केले जाऊ शकतात दूर
जर तुम्ही पूर्ण नियमाने उपवास केला तर याने तुमची पचनक्रियाच चांगली होत नाही तर अनेक आजारांपासूनही सुटका मिळण्याचीही शक्यता असते. यात आर्थरायटिस, असथमा, हाय ब्लड प्रेशर, नेहमीचा थकवा, कोलाइटिस, स्पास्टिक कोलन, इरिटेबल बॉवेल आणि अनेकप्रकारच्या मानसिक आजारांपासूनही सुटका होण्याची शक्यता असते.
वाढते एनर्जी लेव्हल
काही दिवसांचा उपवास भलेही तुमची एनर्जी कमी करतो, पण याने तुमची इच्छाशक्ती वाढते. उपवास जितका जास्त दिवसांचा असेल शरीराची ऊर्जा तितकी जास्त वाढेल. उपवास करणाऱ्यांना श्वासोच्छवासाचा त्रास कमी होतो. तसेच याने चवीच्या ग्रंथी पुन्हा सक्रिय होऊन काम करु लागतात. उपवासाने आत्मविश्वास इतका वाढतो की, तुम्हाला अनेक आजारांशी लढण्याची एनर्जी मिळते.