स्मरणशक्ती वाढवायचीय? - २९ चा पाढा! हा एक अतिशय उत्तम प्रयोग, कसा ते वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 09:32 AM2023-09-21T09:32:05+5:302023-09-21T09:33:15+5:30
पाढा पाठ करणे याबरोबर अजून किती तरी मार्गांनी स्वत:ला तपासता येईल. कोणत्याही गोष्टीचा नियमित सराव केल्याने ती गोष्ट स्मरणकेंद्रात नक्कीच जाते.
१९ आणि २९ चा पाढा शाळेतल्या वयात कदाचित लक्षात राहिला नसेल. पण हा पाढा पाठ करण्याचा प्रयत्न नंतरच्या वयात तरी आपण कधी केला का ? की पाठ होत नाही म्हणून सोडून दिला तो दिलाच?... आणि नंतरच्या वयात तर तो पाठ करण्याची गरजच काय म्हणून त्याकडे परत लक्षच दिलं नाही? - अर्थात असं आपल्यापैकी बहुतेकांचं होतं.
आता, आपलं वय कितीही असो, पाढा पाठ असण्याची गरज नसो, पाढा पाठ करून बघायचं का? २९ चा पाढा पाठ करायला किती दिवस लागतील? हा पाढा रोज, नियमित म्हटला तर लवकर पाठ होईल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाढा पाठ झाल्यावर सराव केला नाही तर विसरून जाईल का? आपली स्मरणशक्ती चांगली आहे का, हे तपासायचं असेल तर हा एक अतिशय उत्तम प्रयोग आहे.
पाढा पाठ करणे याबरोबर अजून किती तरी मार्गांनी स्वत:ला तपासता येईल. कोणत्याही गोष्टीचा नियमित सराव केल्याने ती गोष्ट स्मरणकेंद्रात नक्कीच जाते. कदाचित तुम्हाला हा रिकामपणचा उद्योग वाटेल पण, आजच संध्याकाळी एखाद्या बागेत जा. तिथे कितीतरी माणसं दिसतील, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातल्या मनात त्यांचं वर्णन करा. वय, पेहराव, चालण्याची पद्धत हे सगळं डोक्यात साठवून ठेवा. घरी गेल्यावर आठवा. स्मरणशक्तीला ताण द्या. यातून आपण स्मरणकेंद्रातल्या पेशींना कामाला लावत आहोत. डोळे मिटून आपल्या घरातल्या एकेका खोलीमध्ये काय आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत, हे आठवा. एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत घडलेलं दृश्य पुन्हा एकदा आठवा. त्या दृश्यामध्ये काय काय होतं याचं बारकाईने वर्णन लिहून काढा.
अभिनेते – अभिनेत्री आपल्या लक्षात राहातातच. पण त्यांचे कपडे कोणत्या रंगाचे होते, मागच्या भिंतीवर कोणतं चित्र लावलेलं होतं, भिंत, सोफा, पलंग, खुर्च्या कोणत्या रंगाच्या होत्या ? यातलं जास्तीत जास्त आठवायचा प्रयत्न करा. किती गोष्टी आठवल्या ? किती निरीक्षणातून निघून गेल्या ? घराच्या बाहेर असताना आपल्या घरातल्या खिडक्यांच्या गजांचं डिझाइन कसं आहे, आठवतं का? गोष्टी सजगपणे बघणं याची नियमित सवय लागली की, स्मरणशक्ती वाढतेच.
- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com