गुन्ह्याच्या जास्त बातम्या पाहून किंवा वाचून होतो 'हा' मानसिक आजार, तुम्हीही असं करता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 10:25 AM2024-07-03T10:25:07+5:302024-07-03T10:33:29+5:30
Mean World Syndrome : एक्सपर्ट सांगतात की, वेगवेगळ्या माध्यमांवर गुन्हे विश्वातील घटना सतत बघणं किंवा वाचणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं.
Mean World Syndrome: वृत्तपत्र किंवा टीव्ही किंवा वेबसाईट्स आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या घटना वाचायला, बघायला मिळतात. आजकाल गुन्हे विश्वातील अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. कुठे खून, कुठे दरोडा तर कुठे आणखी काही सतत घडत असतं. अशा घटना लोकांचं लक्ष वेधून घेत असतात. महत्वाची बाब म्हणजे अशा घटना खूप काळ लक्षात राहतात. पण या घटनांबाबत सतत वाचणं किंवा त्या बघणं मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. ते कसं हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
एक्सपर्ट सांगतात की, वेगवेगळ्या माध्यमांवर गुन्हे विश्वातील घटना सतत बघणं किंवा वाचणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतं. मीडियामध्ये रिअल आणि काल्पनिक हिंसेशी संबंधित जास्त घटना बघितल्याने किंवा वाचल्याने मीन वर्ल्ड सिंड्रोम (Mean World Syndrome) चा धोका असतो.
मीन वर्ल्ड सिंड्रोम म्हणजे काय?
मीन वर्ल्ड सिंड्रोम एक अशी स्थिती आहे ज्यात व्यक्ती एखादी हिंसा किंवा गुन्हा खरा मानतात आणि त्या घटनेकडे बघून अस्वस्थ होतात किंवा त्या हिसेंच्या सीनमध्ये स्वत:ला गुंतवून बघतात. याचा मेंदुवर वाईट प्रभाव पडतो. काही लोकांना अशा घटना किंवा हिंसा पुन्हा पुन्हा बघाव्या वाटतात. मेंदू अशा हिंसा किंवा गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या मुव्ह्स, घटना आणि आयडियामध्ये गुंतून जातो आणि स्वत:ला डिटेक्टिव मानून गुन्ह्याची कल्पना करू लागतो.
घातक आहे हा सिंड्रोम
डॉक्टर सांगतात की, या मानसिक स्थितीचा सगळ्यात वाईट प्रभाव असा पडतो की, व्यक्ती समाजासोबत अजब व्यवहार करू लागतो. लोक गुन्ह्याच्या विश्वासोबत असे कनेक्ट होतात की, त्यांना जागोजागी भितीच भीती वाटते. त्यांना प्रत्येक व्यक्तीवर संशय येतो, सगळीकडे अंधकार दिसतो आणि ते कुणालाही गुन्हेगार मानू लागतात.
यामुळे व्यक्तीच्या मेंदुत विनाकारण भीती, चिंता आणि नैराश्य येतं आणि व्यक्ती हळूहळू समाजापासून दूर राहू लागते. कधी कधी असे लोक प्रमाणापेक्षा जास्त सतर्क होतात आणि परिवारासोबतही अजब वागू लागतात. एक्सपर्टनुसार, १९९० पासून टीव्हीवर फॅंटसी क्राइम दाखवण्याचं चलन वाढलं आहे आणि लोक मीन वर्ल्ड सिंड्रोमच्या जाळ्यात अडकत आहेत.