कितीही पौष्टिक पदार्थ खा, पण पाण्याची सर कशालाच नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 05:40 PM2017-08-09T17:40:11+5:302017-08-09T17:41:55+5:30
पाण्याइतकं आरोग्यदायी दुसरं काहीच नाही. तुमचं आयुष्याच ते पाणीदार करून टाकतं.. वाचा या दहा गोष्टी..
- मयूर पठाडे
रोज किती पाणी आपण प्यायला पाहिजे? कोणी सांगतं सहा ग्लास, कोणी म्हणतं सात, कोणी आठ.. डॉक्टरही काही सांगतात. कोणी म्हणतं, असं काही नाही. तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जास्तही नाही आणि कमीही नाही.. काही जण तर सांगतात, जास्त पाणी उलट पिऊच नये. नाहीतर तुमची तब्येत कधीच सुधारणार नाही. असेच राहाल तुम्ही किरकाडे..
मग नेमकं रोज पाणी प्यायचं तरी किती?
जाऊ द्या.. ते आपण त्या त्या व्यक्तीवरच सोडू. नाहीतर इथेच भांडणं व्हायला लागतील.
पाणी किती प्या, हा जरी प्रश्न असला तरी पाणी पिऊच नका, असं आजवर कोणीही म्हटलेलं नाही. आपल्या शरीरासाठी, शरीराच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठीही पाणी अत्यावश्यक आहे.
मग या पाण्याचाच आपण विचार करू.
काय काय फायदे आहेत पाण्याचे?
१- पाण्यामुळे आपला थकवा दूर होतो. थकलेले असल्यानंतर पहिल्यांदा आपण पाणी पितो आणि ताजंजवानं वाटायला लागतं ते यामुळेच.
२- पाण्यामुळे आपला मूडही चांगला राहातो. मूड स्विंग टळतात.
३- डोकेदुखी आणि अर्धशिशीसारख्या प्रकरांवर पाण्याचा चांगला उपयोग होतो.
४- अपचन होणं, बद्धकोष्ठता यासारख्या विकारांवरही पाणी उत्तम विरेचक म्हणून काम करतं.
५- वजन कमी करण्यासाठी तर पाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं आपल्या साºयांना माहीतच आहे.
६- आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी उपयुक्त ठरतं. घाम आणि लघवीवाटे हे विषारी घटक बाहेर पडतात.
७- आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित राखण्यासाठीही पाणी खूपच उपयुक्त आहे.
८- आपल्या त्वचेलाही पाण्याची गरज असते. पाण्यामुळे त्वचा नितळ राहाण्यास मदत होते. ती कोरडी पडत नाही.
९- तुम्ही जर मद्यप्राशन करणारे असाल, किंवा केलेलं असलं तर हॅँगओव्हर उतरण्यासाठीही पाण्याचा चांगला उपयोग होतो. पटकन रिकव्हरी मिळते.
१०- अनेकांना श्वास दुर्गंधीचा त्रास असतो. त्यांच्या श्वासातून येत असलेल्या दुर्गंधीमुळे त्यांच्या जवळपास उभं राहाणंही लोकं टाळतात. श्वासाच्या दुर्गंधीच्या त्रासाची पाण्यामुळे सुटका होऊ शकते.