वजनाचा काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:07 AM2018-04-12T09:07:07+5:302018-04-12T09:07:07+5:30

शरीराचं वजन कशावर अवलंबून असतं? ते वाढतं किंवा अजिबात वाढत नाही ते कशामुळे?

Weighing | वजनाचा काटा

वजनाचा काटा

googlenewsNext

- डॉ. यशपाल गोगटे


आजकाल चारचौघं जमले की काही विषयांवर हमखास गप्पा रंगतात. राजकारण, सिनेमा, क्रिकेट या तीन महत्त्वाच्या विषयांबरोबरच चौथा महत्त्वाचा विषय म्हणजे वजन. मग ते वाढलेले असो वा न वाढणारं असो...
हा असा विषय आहे की लठ्ठ असो वा बारीक कोणीही त्याच्या वजनावर समाधानी नसतोच. प्रत्येकाचं स्वत:च्या वजनाच्या बाबतीत मत आणि अनुभव वेगवेगळे असतात. पण, वजन वाढण्याचा संबंध खाण्याशी, व्यायाम अजिबातच न करण्याशी आणि आपल्या हार्मोन्स इम्बॅलन्सशीही असतो हे मात्र आपण कधी समजूनच घेत नाही.
शरीराचं वजन कशावर अवलंबून असतं? तर मांसल पेशी, चरबी, हाडं, पाणी व अवयव यावर. हृदय, लिव्हर, किडनी, मेंदू हे अवयव वजनदार असले तरी एकदा तरुण वयात स्थिर झाल्यावर त्यांच्यात फारसा बदल होत नाही. म्हणून खरं पाहता, शरीराचं वजन हे मुख्यत्वे चार घटकांवर अवलंबून असतं, मांसल पेशी, चरबी, हाडं आणि पाणी. यातही वजनात धोकादायक चढ- उतार हा प्रामुख्यानं चरबी आणि पाणी यामुळे होत असतो. आजचा लेख हा हार्मोन्सशी निगडित असल्यामुळे आपण चरबीमुळे होणारे वजनातील बदल विस्तारानं बघू.
वजन : मित्र की शत्रू ?
१९५० च्या दशकात जेव्हा हृदयरोगाचा संबंध कोलेस्टेरॉलशी जोडला गेला तेव्हा चरबीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. चरबीला अगदी दुश्मन बनवून वाळीत टाकण्यात आलं. फॅट फ्री, कोलेस्टेरॉल फ्री अशा उत्पादनांची बाजारात चलती झाली. या उलट आजकाल व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक अशा सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेसमध्ये कोलेस्टेरॉलचे गुणगान वाचायला मिळतं. यामुळे बाजारात शुद्ध देसी घीमध्ये बनवलेल्या खाद्यपदार्थांचा सुळसुळाट झाला आहे. एवढंच नव्हे तर काही लोकांनी हे मेसेज वाचून अक्षरश: कोलेस्टेरॉलची गोळीदेखील बंद केली; पण यातलं खरं काय नि खोटं काय हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्यायला हवं.
हे समजून घेण्यास आपल्याला जावं लागेल १९५० च्या दशकात. युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये हृदयविकारांचं प्रमाण वाढत होते. त्यामुळे काही संशोधकांनी या मागची कारणं शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या देशातील रोग्यांच्या खानपानाचं विश्लेषण केलं. त्यांना आढळून आलं की जास्त चरबीयुक्त अन्नाचं सेवन केल्यावर हृदयविकाराचं प्रमाण वाढतं. त्यामुळे निष्कर्ष काढण्यात आला की चरबी ही हृदयरोगासाठी घातक आहे. पण, फ्रान्स देशात हा समज खोटा ठरला. अन्नात जास्त चरबी असूनही तेथील लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी आढळलं. याला ‘फे्रन्च पॅराडॉक्स ’ असं म्हणतात. पुढे जाऊन संशोधन केल्यास चरबीत असणारे चांगले आणि वाईट हे दोन प्रकार कळले आणि विकसित झाले ते मेडिटेरेनियन डाएट ज्यात चरबीचं प्रमाण जास्त असूनही हृदयविकार होण्याचा धोका कमी असतो.
शरीरात साठलेल्या चरबीचेही चांगले आणि वाईट असे दोन प्रकार आढळतात. शक्यतो पोटाच्या आजूबाजूला साठलेली चरबी- ढेरी ही धोकादायक समजली जाते. या उलट खांद्याच्या आणि कमरेच्याच्या (हिप) आवतीभोवती प्रमाणात साठलेली चरबी ही कमी धोकादायक असते. शिवाय ब्राउन फॅट या प्रकारात मोडणारी चरबी ही शरीराला उपयोगी ठरून ऊर्जेचं स्रोत असते. तसेच कोलेस्टेरॉलचंही. चांगलं आणि वाईट अशा दोन प्रकारचं असतं. चांगलं कोलेस्टेरॉल शरीराला हार्मोन्स बनवण्यासाठी, रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरतं. या उलट वाईट कोलेस्टेरॉल घातक ठरतं.
त्यामुळे चरबी-कोलेस्टेरॉल मित्र की शत्रू? याचं उत्तर त्याच्या प्रकारावर ठरतं. हे लक्षात घेऊन, अंधपणे फॅड डाएटच्या आहारी न जाता आहारतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार खाण्यापिण्याचे नियम समजून मग त्याप्रमाणं खाणं हे सुज्ञपणाचं ठरावं.
वजन आणि हार्मोन्स याचा संबंध समजून घेण्यापूर्वी या खाण्यापिण्याचाही आपण विचार केलेला बरा.

चांगली चरबी वाईट चरबी

चांगल्या व वाईट अशा चरबीयुक्त पदार्थांचं वर्गीकरण केलं आहे. हे पदार्थ उदाहरणदाखल आहे. त्यानुसार चांगल्या चरबीयुक्त पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करावा. अर्थात चांगले पदार्थसुद्धा प्रमाणातच खाणं अपेक्षित आहे.

चांगले चरबीयुक्त पदार्थ
* तेलबिया- तीळ, जवस, सूर्यफुलाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे अवाकॅडो, आॅलिव्ह
* काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता
* घरी कढवलेलं गायीचं तूप, लोणी, साय
* नारळाचं तेल, शहाळंं, खोबरं.

वाईट चरबीयुक्त पदार्थ
* जुने पुनर्वापर केलेलं तेल
* घराबाहेर बनवलेलं तळलेले पदार्थ
* वनस्पतीजन्य तूप
* प्रमाणाच्या बाहेर तेलकट पदार्थ खाणं.

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोनतज्ज्ञ आहेत. dryashpal@findrightdoctor.com)
 

Web Title: Weighing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य